नवी मुंबई : बेलापूर विधानसभेच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या सततच्या प्रयत्नाने बेलापूर जेट्टीकरिता महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून ८ कोटी ५० लाख मंजूर करण्यात आले असून सदर जेट्टीचे भूमिपूजन नुकतेच माजी विरोधी पक्षनेते श्री. पंढरीनाथ पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. सदर भूमिपूजन सोहळ्यास नगरसेवक दीपक पवार, अशोक गुरखे, डॉ. जयाजी नाथ, डॉ. राजेश पाटील, विजय घाटे, दि. ना.पाटील, महादेव पाटील, नारायण मुकादम, श्रीराम घाटे, शैलजा पाटील, शैला म्हात्रे, पांडुरंग कोळी, प्रकाश मुकादम, बाळासाहेब बोरकर, प्रकाश म्हात्रे, अनंत बोस, रमेश हिंडे, ज्ञानेश्वर कोळी, कैलास कोळी, कमलाकर म्हात्रे, रुपेश दिवेकर तसेच बेलापूर से-१५ येथील असंख्य ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
नवी मुंबई हे सुनियोजित शहर असून नवी मुंबईला एक सुंदर समुद्र किनारा लाभलेला आहे. नवी मुंबईतील दिवाळे, करावे, सारसोळे, वाशी, घणसोली येथील कोळी बांधवांना मासेमारी करणे सोयीचे जावे, नवी मुंबईत एक बंदर विकसित करून शासनाच्या विविध सुविधा त्यांना मिळाव्यात, तसेच मच्छीमारी व्यवसाय करण्याकरिता आवश्यक असणाऱ्या जेट्टी उपलब्ध व्हाव्यात याकरिता बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड, नाबार्ड तसेच राज्यशासनाकडे सतत पाठपुरावा केला होता. सदरबाबत केलेल्या पाठपुराव्यामुळेच बेलापूर जेट्टीकरिता महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून रु. ८.५ कोटी रुपये मंजूर करून आणण्यात आले. यापूर्वीही आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्यामुळेच दिवाळा गाव, सारसोळे गाव व वाशी गाव येथील जेट्टी उदयास आल्या आहेत. बेलापूर जेट्टी निर्माण होत असल्यामुळे तेथे दशक्रिया सारख्या सर्व विधी करता येणार असून जेट्टीमुळे स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होणार आहे. शासनाचा महत्वाचा प्रकल्प असणाऱ्या मरीना प्रकल्पालाही सदर जेट्टीचा फायदा होणार असून येथील स्थानिक मच्छीमार व परिसरातील सर्व नागरिकांनाही याचा लाभ घेता येणार आहे. सदर जेट्टीच्या बाजूलाच रु. ६.५ कोटीची जेट्टी प्रस्तावित असून दिवाळे जेट्टीकरिताही महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून रु. १० कोटी मंजूर करण्यात आले असल्याची माहिती आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी दिली.
यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, नवी मुंबई येथील बहुतांश कोळी बांधव मच्छिमारी व्यवसायावर अवलंबून असून अनेक वर्षांपासून हे कोळीबांधव लगतच्या खाडीमध्ये पारंपारिक पद्धतीने मासेमारी करीत आहेत. नवी मुंबई मधील बेलापूर हे मुंबईच्या प्रवेशद्वारालगतच वसलेले असून देखील अद्याप तेथील मच्छिमार शासनाच्या सुविधेपासून वंचित आहेत. नवी मुंबईलाही एक सुंदर समुद्र किनारा लाभलेला आहे. नवी मुंबईतील दिवाळे, सारसोळे, वाशी येथे जेट्टी निर्माण करण्यात आल्या आहेत. बेलापूर हे माझे गाव असल्याने आज बेलापूर जेट्टीचे भूमिपूजन करताना आनंद वाटत आहे. नवी मुंबईमध्ये एक छोटे बंदर व्हावे अशी मागणीही मी शासनाकडे केली असून लवकरच माझ्या बेलापूर मतदारसंघामध्ये एक बंदर विकसित होणार आहे. नवी मुंबईत बंदर विकसित झाल्यास या शहरातील जे कोळी बांधव आहेत, त्यांना सर्व सुख सुविधा उपलब्ध होऊ शकतील.