पनवेल : मोठा गाजावाजा करून निवडणुकीच्या उंबरठ्यावर स्थानिक आमदारांनी उद्घाटन रेटून नेलेल्या उपजिल्हा रुग्णालयात विविध आजारांवरील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांसह सोनोग्राफी तसेच इतर आजारांची चिकित्सा करणाऱ्या महत्वाच्या अत्याधुनिक यंत्रणेची कमतरता आहे. पर्यायी रुग्णांची हेळसांड आहे. याबाबत पनवेल संघर्ष समितीने राज्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास यांच्याशी काही दिवसांपासून पत्रव्यवहार सुरू ठेवला होता. काल, त्यांच्या मुंबईतील कार्यालयात भेट घेवून ही परिस्थिती ताबडतोब बदलण्याची मागणी लावून धरली.
व्यास यांनी संबंधित प्रकरणी खंत व्यक्त केली. पनवेल उपजिल्हा रुग्णालयात अनेक रोगांवरील तज्ञांची कमतरता आहे. पण आठवडाभरात डॉक्टरांच्या नियुक्तीवर मार्ग काढण्याची त्यांनी तयारी दर्शवली. तसेच पनवेल उपजिल्हा रुग्णालय उत्तमरित्या सुरू रहावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले.
राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारने मंत्री महोदयांची नियुक्ती केल्यावर त्यांच्या परवानगीने राज्यातील सर्वच सार्वजनिक खात्याच्या रुग्णालयाबाबत काही सकारात्मक निर्णय घेता येईल, असे त्यांनी सांगितले. मात्र, संघर्षच्या मागणीनुसार पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची रिक्त पदे आणि यंत्रणांचा अभाव दुर करण्यासाठी अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावून तेथील समस्या मार्गी लावण्यात येतील, असेही ते म्हणाले.
या चर्चेत ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. भक्तीकुमार दवे, संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू, मंगल भरवाड आदींनी सहभाग घेतला होता. उपजिल्हा रुग्णालयात स्त्री रोग तज्ञ, मेडिसीन डॉक्टर, जनरल फिजिशियन, नाक, कान घसा तज्ञ आणि रेडिओलॉजिस्टची पदे त्वरित भरून रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी डॉ. व्यास यांना लेखी पत्र देवून विनंती करण्यात आली. नियमबाह्य प्रतिनियुक्तीने पनवेल रुग्णालयातील अद्याप पाच डॉक्टर बाहेर आहेत त्यांना त्वरित माघारी बोलविण्यात यावे तसेच सोनोग्राफी मशीन, ईसीजी मशीन, डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी थिअटर, शवागृह, शीतपेटी आणि सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याबाबतही सविस्तरपणे चर्चा झाली.
चौकट
· संघर्ष समितीचे मानले आभार
उपजिल्हा रुग्णालयाच्या स्थापनेपूर्वी पासूनच अनेक अडथळे आल्याची कबुली डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली. त्या कामाच्या निकृष्टदर्जापासून ते वाळवीप्रकरण उजेडात आणण्यासाठी पनवेल संघर्ष समितीने केलेल्या कामगिरीबाबत व्यास यांनी मनापासून संघर्ष समिती आणि कांतीलाल कडू यांचे दिलखुलासपणे आभारही मानले.