अनंतकुमार गवई
मुंबई : भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रीपद नाकारल्यावर शिवसेनेने कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मदतीने महाविकासआघाडी बनवित मुख्यमंत्रीपद मिळविले. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळवून देण्यात व महाविकास आघाडी बनविण्यात संजय राऊतांचे श्रेय प्रचंड असले तरी खऱ्या अर्थाने पडद्यामागच्या घडामोडीत शरद पवारच खऱ्या अर्थाने ‘किंगमेकर’ ठरले आहेत. या घडामोडींमध्ये पवार व संजय राऊतांची वाढलेली जवळीक महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राला जवळून पहावयास मिळाली. पवारांमुळे शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळाल्याने त्याची उतराई म्हणून शिवसेना नेते संजय राऊत यांनी २०२२ साली होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीसाठी शरद पवारांसाठी आतापासूनच मोर्चेबांधणीस सुरूवात केली आहे.
राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात मोठी भूमिका वठवलेले शिवसेनेते नेते, खासदार संजय राऊत यांनी आता राष्ट्रपतीपदासाठी मोर्चेबांधणी करण्याच्या कामाला लागले आहेत. सन २०२२ मध्ये होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या नावाचा विचार करावा, असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे. २०२० साली राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचे नाव निश्चित करण्यासाठी आमच्याकडे आवश्यक तेवढे संख्याबळ असेल असा दावाही राऊत यांनी केला आहे. याबाबत लवकरच रणनीती आखली जाईल असेही राऊत म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात महाआघाडीचे सरकार स्थापन करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारली होती. शरद पवार हे देशातील ज्येष्ठ नेते असून मला वाटते की सर्व राजकीय पक्षांनी राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून त्यांचा नावाचा विचार करावा, असे राऊत म्हणाले.
· ५० वर्षाहून अधिक काळ राज्यात तसेच देशाच्या राजकारणात शरद पवारांच्या सक्रिय भूमिकेमुळे सर्वपक्षीयांशी त्यांची जवळीक राहीलेली आहे. त्यातच शरद पवारांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार जाहिर केल्यास महाराष्ट्रातील अधिकाधिक आमदारांचे त्यांना समर्थन मिळण्याची शक्यता आहे.
· राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून शरद पवार यांच्या नावाची मोर्चेबांधणी करण्यासाठी खासदार संजय राऊत हे लवकरच पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, राजस्थान आणि केरळ राज्यांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते त्या त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पवार यांच्या उमेदवारीबाबत चर्चा करणार आहेत. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा करून एक व्यापक अशी योजना तयार केली जाईल असे राऊत म्हणाले. शरद पवार यांच्या नावाला कुणी विरोध करणार नाही, अशा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला आहे.
· राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे देशातील सर्वात ज्येष्ठ नेते आहे आणि म्हणूनच त्यांचा सन्मान झालाच पाहिजे, असे राऊत म्हणाले. पवार यांचा प्रशासकीय अनुभव आणि राजकीय कुशाग्रता पाहता त्यांना भारताचा घटनात्मक प्रमुखपदावर बसवणे योग्य ठरेल, असेही राऊत म्हणाले. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यामध्ये शरद पवार यांचे मोठे योगदान असल्याने पवार यांच्याप्रती राऊत यांची नैतिक जबाबदारी आहेच, असे राजकीय अभ्यासकांचे मत आहे.