सुवर्णा खांडगेपाटील
मुंबई : केंद्रातील मोदी सरकार कडून आणण्यात आलेल्या CAA, NRC या कायद्याच्या विरोधात राज्यातील ओबीसी संघटना एकवटल्या आहेत. देशभरात या कायद्याच्या विरोधात रान पेटलेल्या असतानाच राज्यातही हा कायदा लागू होऊ नये आणि देशातील इतर विविध राज्यांनी आणि ओबीसी लोकप्रतिनिधींनी यासाठी आता पुढाकार घ्यावा, म्हणून एक महत्वाची बैठक मुंबईत होत आहे.
सोमवारी 13 जानेवारी रोजी मरीन लाईन येथे असलेल्या इस्लाम जिमखाना येथे सकाळी 11.00 वाजता राज्यातील विविध ओबीसी संघटनांच्या प्रमुखांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
ही बैठक प्रामुख्याने राज्यातील विविध ओबीसी संघटनांची असून यात प्रामुख्याने बारा बलुतेदार संघटनेचे अध्यक्ष कल्याण दडे, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष शब्बीर अहमद अन्सारी यांच्यासह राज्यातील इतर ओबीसी संघटनांचे प्रमुख प्रतिनिधी या बैठकीला हजर राहणार आहेत.
केंद्र सरकारच्या CAA, NRC कायद्याला हाणून पाडण्यासाठी देशभरातील ओबीसी ने एकत्र यावे असे, आवाहन या बैठकीच्या माध्यमातून केले जाणार असल्याची माहिती ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष शब्बीर अहमद अन्सारी यांनी दिली.
राज्य विधीमंडळाच्या नुकत्याच झालेल्या एक दिवसाच्या अधिवेशनात राज्यातील ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी यासाठीचा ठराव मंजूर झाला असून त्याचे राज्यातच नव्हे तर देशभरातील अनेक राज्यात पडसाद उमटले आहेत. अनेक राज्यांनी अशा प्रकारचा ठराव करण्याची भूमिका घेतली असून त्या पार्श्वभूमीवर ओबीसी संघटनांकडून या बैठकीत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या या ठरवाबद्दल एक अभिनंदनाचा प्रस्ताव सुद्धा मांडला जाणार आहे. इस्लाम जिमखाना येथे होणाऱ्या बैठकीला राज्यभरातील ओबीसी नेत्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन शब्बीर अन्सारी यांनी केले आहे.