सुवर्णा खांडगेपाटील :Navimumbailive.com@gmail.com
पनवेल : सर्वच निकषांवर अर्धवट स्थितीत लोकार्पण केलेल्या पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील बहुचर्चित स्त्री रोग तज्ञांच्या रिक्त पदाचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आणि प्रतिनियुक्तीवर पाठवलेल्या डॉक्टरांना माघारी बोलावण्याचा तिढा कायमचा सुटला आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयातच प्रसूतीची व्यवस्था कार्यान्वित होईल, यावर आज शिक्कामोर्तब झाले आहे. या सर्व घडामोडींना पनवेल संघर्ष समितीच्या अभ्यासपूर्ण रेट्यामुळे यश आले आहे.
पनवेल उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर, वैद्यकीय यंत्रणा, अपुरे मनुष्यबळ, कामगारांच्या पगाराचा प्रश्न, जनरेट सेवा, डॉक्टरांची प्रतिनियुक्ती प्रकरण यावर पनवेल संघर्ष समितीने काही दिवसांपूर्वी आरोग्य खात्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास यांच्या सोबत बैठक घेऊन कैफियत मांडली होती. त्यानंतर त्यांनी तातडीने अधिकाऱ्यांची बैठक घेवून संघर्षच्या मागणीनुसार डॉक्टरांच्या रिक्त जागा भरण्याचे आणि प्रतिनियुक्ती रद्द करण्यासाठी आदेश दिले होते.
डॉ. व्यास यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आल्याची माहिती देताना स्त्री रोग तज्ञांबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी आरोग्य खात्याच्या उपसंचालिका डॉ. गौरी राठोड यांनी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात पनवेल संघर्ष समितीसोबत बैठक घेतली. समितीचे सल्लागार डॉ. भक्तीकुमार दवे, अध्यक्ष कांतीलाल कडू, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. नागनाथ येमपल्ले, प्रशासकीय अधिकारी सुभाष जाधव, सहाय्यक अधिपरिसेविका गुरव आदी जण उपस्थित होते.
राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या सेवेत असलेल्या डॉ. स्वाती नाईक आणि डॉ. घोंगडें यांच्याशी आज बैठकीतून संपर्क साधण्यात आला. उभयतांनी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात रुजू होण्यास संमती दर्शवली आहे.
उपजिल्हा रुग्णालयात राज्य शासनाच्या आरोग्य खात्यामार्फत नियुक्ती केलेल्या सहा डॉक्टरांना प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले होते. त्यांची नियुक्ती नियमबाह्य असल्याचे स्पष्ट करून डॉक्टरांना माघारी बोलावण्याची मागणी संघर्षने रेटून लावली होती. तीला आज प्रत्यक्षात मुहूर्तरुप आले. डॉ. गौरी राठोड यांनी एका आदेशाद्वारे त्यांची प्रतिनियुक्ती रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय लेखी आदेशाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गवळी यांना दिले आहेत.
सहा पैंकी डॉ. डुबल यांना नवी मुंबई महापालिकेत नोकरी लागल्यामुळे त्यांनी राज्य शासनाची सेवा सोडली आहे. डॉ. प्रमोद पाटील आधीच हजर झाले आहेत. आता उर्वरित चार डॉक्टरांचा सोमवारपासून उपजिल्हा रुग्णालयात हजर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
************************
नागरिकांनी आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा!
सार्वजनिक आरोग्य सेवांबाबत असलेले काही न्यूनगंड आणि गैरसमज मनातून काढून पनवेल उपजिल्हा रुग्णालयाच्या सेवेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य खात्याच्या उपसंचालिका डॉ. गौरी राठोड यांनी केले आहे. जास्तीत जास्त आरोग्य सुविधा रुग्णांना देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असून रुग्णालयात सर्व सोयी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहु असे त्या म्हणाल्या.