स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com – 9820096573
नवी मुंबई : सामाजिक व राजकीय जीवनात गणेश नाईक कधीही लाचार झाला नाही. चमकत राहीला व चमकत राहणार. स्वाभिमान कधीही गहाण ठेवला नाही. सर्वाशी संबंध चांगले ठेवले. मतांचा विचार केला नाही. इतिहासात गद्दारांची तसेच स्वामिनिष्ठांची दखल घेतली जाते. गणोजी शिर्केच्या गद्दारीमुळे संभाजीराजे गेले. तानाजी मालुसरेंसारख्या निष्ठावंतांनी प्राणाची आहूती देवून कोंढाणा जिंकला. रंजल्या गांजल्यांची सेवा करा. लोकांचे दु:ख दूर करा. नि:स्वार्थीपणे जनसेवा करणाऱ्यांच्या मागे गणेश नाईक उभा आहे. नवी मुंबईला २५ वर्ष महापौर दिला असून अजून २० वर्ष महापौर देणार असल्याचा विश्वास ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त केला.
भाजपच्या प्रभाग ८५च्या नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील यांच्या प्रभागातील कुकशेत गावातील नागरी आरोग्य केंद्राचे नामकरण, नुतन शाळेचे भूमीपुजन, कुकशेत गावातील नवीन प्रवेशद्वार या कामांचे उद्घाटन ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आमदार गणेश नाईक बोलत होते.
मुंबईतील आगरीपाडा व सायन कोळीवाडा पाहिल्यावर त्यांची आज जी अवस्था आहे, तशी अवस्था नवी मुंबईत होवू नये ही जबाबदारी सर्वाची आहे. मुंबईतील आगरीपाड्यात आगरी राहत नाही व सायन कोळीवाड्यात कोळी दिसत नाही. सुरूवातीला मी आमदार नसताना हर्डीलिया कंपनीत ८५ लोकांना रोजगार दिला. किमान २०० वेळा कंपनीच्या गेटवर हेलपाटे मारले. रोजगार दिला म्हणजे मी कोणावर उपकार नाही केले. समाजाची सेवा केली. कोणी मला सलाम करावा, कोणी माझे उपकार मानावे ही माझ्या आयुष्यातील धारणा नाही. लोकांना इतिहास माहिती नसतो. काही बरळत असतात. सिडकोकडून देण्यात येणाऱ्या विद्यावेतनाबाबत सर्वप्रथम १९७७ साली आम्ही आंदोलन केले. १०० ते १५० लोक होते.पोलिस यायचे, अटक करायचे, सोडून दिल्यावर पुन्हा गेटवर येवून आंदोलन करायचे. अखेर सिडकोला आपण विद्यावेतन सुरू करण्यास भाग पाडले असल्याची आठवण उपस्थितांना सांगितली.
आज आगरी-कोळी भवन आहे. मराठा भवन आहे. नवी मुंबईत राहणाऱ्या सर्व जातीधर्मियांची भवने झाली पाहिजेत, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. महापौरांनी लोकसंख्येनुसार यादी करावी. प्रत्येक घटकाची वास्तू उभी राहील यासाठी प्रयत्न करावे. सर्व जातीधर्मियांची वास्तू उभी राहील , त्यावेळी येथे खऱ्या अर्थाने रामराज्य सुरू होईल. गणेश नाईकांनी बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी प्रत्येक कंपनीच्या प्रवेशद्वारावर हेलपाटे मारले आहेत. कधी श्रेय घेतले नाही. कोणीही श्रेय घ्या पण लोकांची कामे झाली पाहिजेत ही आपली नेहमीच भूमिका राहीली आहे. बाळाराम पाटलांची जनसेवेची भूमिका वारसारूपाने सुरज पाटलांनी चालविली. त्यानंतर सुजाता पाटलांनी चालविली असे सांगत आमदार गणेश नाईकांनी माजी नगरसेवक कै. रामचंद्र पाटील यांच्याशी असलेल्या संबंधांना उजाळा देत काही आठवणी सांगितल्या.
दादा व कुकशेत गाव हे फार पूर्वीपासून अगदी रामचंद्र पाटलांपासून एक आगळेवेगळे नाते असल्याचे सांगत महापौर जयवंत सुतार पुढे म्हणाले की,दादांनी सुरूवातीच्या काळात कंपन्याकडे पाठपुरावा करून ग्रामस्थांना रोजगार मिळवून दिला. स्थंलातर करून काही होणार नाही. ग्रामस्थांना रोजगार मिळाला, गावातील बेरोजगारी हटली तरच गाव नावारूपाला येईल अशी दादांची धारणा होती.गावच्या विकासासाठी दादांनी कुकशेतच्या ग्रामस्थांना भुखंड उपलब्ध करून दिले. ग्रामस्थांना दोन एफएसआय मिळावा यासाठी दादांनी प्रयत्न केले, पण यश आले नाही. गावच्या विकासासाठी स्थानिक नेतृत्व निर्माण झाले पाहिजे. नाही निर्माण झाले तर आपण केले पाहिजे या भावनेतून कुकशेतच्या गावाच्या विकासाची धुरा दादांनी सुरूवातीला रामचंद्र पाटलांकडे सोपविली. त्यावेळी त्यांना दादांनी खाणीकडे दुर्लक्ष करा. विकासाकडे लक्ष द्या सांगितले. रामचंद्र पाटलांकडे विकासाबाबत एक तफड होती. उमेद होती. पण नियतीच्या मनात वेगळेच असल्याने रामचंद्र पाटील अर्ध्यावरच साथ सोडून गेले. पोटनिवडणूकीला सचिन पाटील उभे राहीले. पण कॉलनीतील एका मतपेटीत १२५ मते कमी पडल्याने पराभव झाला. २००० साली दादांच्या नेतृत्वाखाली व बाळाराम पाटलांच्या मार्गदर्शनाखाली सुरजला संधी मिळाली. सुरज नगरसेवक झाल्याचे सांगताना महापौरपदाच्या कालावधीत मोरबे धरण, जिल्हा परिषद शाळांचे हस्तांतरण यासह संजीव नाईकांनी केलेल्या कामांची माहितीही महापौर जयवंत सुतारांनी यावेळी सांगितली.
प्रास्तविकपर भाषणातून सुरज पाटील यांनी सुरूवातीलाच कुकशेत गावाचा विकास केवळ गणेश नाईकांमुळेच शक्य झाला असल्याचे सांगत कृतज्ञता व्यक्त केली. कुकशेत गावात विकास कसा झाला याचाही आढावा सुरज पाटलांनी यावेळी आपल्या भाषणातून घेतला. सारसोळे गाव, नेरूळ गावाचाही विकास दादांमुळेच झाला. दादांनी विकासकामे करताना कधीही दुजाभाव केला नाही. विकासकामे करताना आम्ही दादांकडे जो जो हट्ट केला, तो तो हट्ट दादांनी पुरविला असल्याचे सुरज पाटील यांनी यावेळी आपल्या भाषणातून विनम्रपणे सांगितले.
शाळेतील समीर ठक्कर या मुलाने इंग्रजीतून भाषण करताना आमदार गणेश नाईकांचे व सुरज पाटलांचे तसेच सुजाता पाटलांचे आभार मानले. यावेळी व्यासपिठावर माजी खासदार संजीव नाईक, पालिकेतील सभागृह नेते जयवंत सुतार, नगरसेवक गिरीश म्हात्रे, परिवहनचे माजी सभापती प्रदीप गवस, नगरसेविका सौ. जयश्री ठाकूर, सौ. रूपाली भगत, चंदू जगताप, भास्कर यमगर्ल, कुकशेतचे माजी सरपंच बाळाराम पाटील, कुकशेतचे ग्रामस्थ, कार्यकारी अभियंता सुभाष सोनवणे, सचिन पाटील, स्थानिक नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र कोंडे यांनी केले.