नवी मुंबई : कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर नेरूळवासियांची काळजी घेण्यासाठी जनसेवक गणेशदादा भगत आणि भाजपच्या प्रभाग ९६च्या नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी नेरूळ (प.) नोडमध्ये रहीवाशांना बुधवारपासून (दि.१८ मार्च) मोफत मॉस्क वितरणास सुरूवात केली आहे.
नेरूळ पश्चिममधील रिक्षा स्टॅण्डमधील रिक्षा चालक व प्रवासी, रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडणारे प्रवासी व प्रवासासाठी आत जाणारे प्रवासी, सर्व मार्केट परिसरातील व्यापारी व ग्राहक, ज्येष्ठ नागरिक, मार्केट, रस्त्यावरील पादचारी, नेरूळ सेक्टर १६, १६ए, १८, २४ मधील रहीवाशी या सर्वाना मॉस्क वाटपास सुरूवात झाली आहे.
नागरिकांनी कोरोना व्हायरसला घाबरून न जाता जागरूक राहून परिस्थितीचा सामना करून प्रशासनाला योग्य सहकार्य करा व दिलेले मास्क कोठेही रस्त्यावर टाकू नका, घराबाहेर पडू नका, शक्य झाल्यास प्रवास टाळा, गर्दीच्या ठिकाणी जावू नका, स्वच्छतेला प्राधान्य द्या, असे आवाहन जनसेवक गणेशदादा भगत यांनी केले.
यावेळी समाजसेवक आनंदराव पवार, गोरक्षनाथ गांडाल, चंद्रकांत महाजन, सागर मोहिते, रविंद्र भगत, रिक्षा चालक नेरुळ विभाग कमिटी मधील पद्माकर मेहेर, निवृत्ती म्हात्रे, मंगेश कदम, राजेश पवार, विनोद ठाकूर उपस्थित होते. सायंकाळी ६ वाजल्यापासून भाजप जनसंपर्क कार्यालय ,सेंचुरी सोसायटी, ए-६,०:१४ सेक्टर-१६ नेरुळ येथे मोफत मास्क वाटप ठेवण्यात आले आहेत. नेरूळवासियांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि कोरोना रोगाच्याविरोधात लढा देण्यासाठी एकत्रित प्रयत्न करू या असे आवाहन प्रभाग ९६च्या नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी केले आहे.