नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी
अॅड. महेश जाधव : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिकेच्या प्रथम संदर्भ रूग्णालयात आलेल्या ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांना सॅनिटायझर (जंतुनाशक द्रव्य) व मॉस्क देण्यासाठी पालिका प्रशासनाचा आरोग्य विभाग जी तत्परता दाखवितो, तीच तत्परता पालिका रूग्णालयात येणाऱ्या करदात्या नागरिकांच्या बाबतीतही आरोग्य विभागाने दाखवावी अशी मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष आणि नेरूळ तालुका ब्लॉक अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे गुरूवारी केली आहे.
ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक यांनी कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिका आरोग्य विभागाकडून कितपत जय्यत तयारी करण्यात आली आहे याची पाहणी करण्याकरिता बुधवार, दि. १८ मार्च रोजी आले होते. त्यांच्यासोबत नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांच्यासमवेत पालिका पदाधिकारी व माजी नगरसेवक होते. हे मान्यवर पालिका रूग्णालयात आल्यावर त्यांना तात्काळ हॉस्पिटल व्यवस्थापणाकडून सॅनिटायझर (जंतुनाशक द्रावण) व मास्कची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. तथापि पालिका रूग्णालयात येणाऱ्या सर्वसामान्य जनतेला, नवी मुंबईकरांना, रूग्णांना पहावयास येणाऱ्या नातलगांना ही सुविधा पालिका प्रशासनाचा आरोग्य विभाग का उपलब्ध करून देत नाही. आमदार, महापौर, आजी-माजी नगरसेवक पालिका रूग्णालयात येतात त्यावेळी सॅनिटायझर (जंतुनाशक द्रावण), मास्क देण्यासाठी पालिका प्रशासन पायघड्या घालते हे चित्र नवी मुंबईकरांना पहावयास मिळत असताना दुसरीकडे मात्र रूग्णालयात येणाऱ्या करदात्या नवी मुंबईकरांकडे मात्र कानाडोळा करते. मुळातच नवी मुंबईचा कारभार हा राजकारण्याच्या खिशातून नाही तर करदात्या नवी मुंबईकरांनी केलेल्या कराच्या भरण्यातून होत आहे. रूग्णालयाचा खर्च, कर्मचारी वेतन या बाबी करदात्याच्या करातूनच पूर्ण होत असतात, याचा आरोग्य विभागाला विसर पडला आहे. जी वागणूक आमदार, महापौर, आजी-माजी नगरसेवकांना आरोग्य विभाग देत आहे, तीच वागणूक रूग्णालयात येणाऱ्या सर्वसामान्य करदात्या नवी मुंबईकरांनाही मिळणे आवश्यक आहे, यासाठी रवींद्र सावंत यांनी घडला प्रकार लेखी तक्रारपत्रातून पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून देताना नाराजी व्यक्त केली आहे.
महापालिका मुख्यालयात तसेच रूग्णालय, नागरी आरोग्य केंद्र, माता बाल रूग्णालय या ठिकाणी कोणत्या दर्जाचे हॅण्ड वॉश वापरले जात आहे याची पालिका आयुक्तांनी स्वत: पाहणी करावी. हॅण्ड वॉशकरता जंतुनाशक द्रावण आहे का नुसते पाणी आहे, तेच समजत नाही. या ठिकाणच्या शौचालय सफाईकडेही लक्ष द्यावे. लिक्विडची पाहणी केल्यास तथ्य व गांभीर्य निदर्शनास येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी स्वच्छतेचा ठेका दिलेल्या कंत्राटदारांना कडक भाषेत निर्देश देवून स्वच्छतेबाबत आदेश द्यावेत, जे पालन करणार नाहीत, गांभिर्य समजून घेणार नाहीत त्यांना काळ्या यादीत टाकून करदात्या नवी मुंबईकरांच्या हिताची जोपासना करावी अशी मागणी रवींद्र सावंत यांनी केली आहे.
याशिवाय माता-बाल रूग्णालये, नागरी आरोग्य केंद्र, महापालिका मुख्यालय या ठिकाणी येणाऱ्या करदात्या नवी मुंबईकरांनाही या सुविधा मिळणे आवश्यक आहे. राजकारण्यांना जो मान-सन्मान मिळतो, तो करदात्या नवी मुंबईकरांनाही मिळावा, हीच माफक अपेक्षा आहे. आमच्या म्हणण्याचे गांभीर्य जाणून न घेतल्यास व कानाडोळा केल्यास पालिका प्रशासन राजकारणी व सर्वसामान्य करदाते नवी मुंबईकर यांच्याबाबत करत असलेला दुजाभाव दाखवू नये अशी अपेक्षा रवींद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाकडून बाळगली आहे.