अॅड. महेश जाधव : स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : ठाण्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईकांनी त्यांच्यासह महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ३ नगरसेवकांचा अपवाद वगळता सर्वच नगरसेवकांनी भाजपत प्रवेश केला. (त्यातील नंतर काही दुसरीकडे गेले). त्यानंतर कॉंग्रेसच्या अनेक नगरसेवकांनी गणेश नाईकांच्या नेतृत्वाखाली भाजपत प्रवेश केला. नवी मुंबई कॉंग्रेसमध्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतपत नेतेमंडळी जनसामान्यात कार्यरत आहेत. त्यामध्ये बेलापुर विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे नेते रवींद्र सावंत यांचे नाव नेहमीच प्रकाशझोतात असते. कोरोना काळातही नेरूळ जुईनगरमधील परिवारांना धान्यवाटप, गरजूंना अन्नवाटप, सोसायट्यांमध्ये धुरीकरण, भाज्यांचे व फळांचे वितरण, पत्रकारांना मदत अशा विविध गोष्टी कोरोना काळातही करताना रवींद्र सावंत यांनी कॉंग्रेस संघटनेला नेरूळ-जुईनगर परिसरात बळकटी आणण्याचे कार्य सुरुच ठेवले आहे.
एकीकडे भाजपचे नगरसेवक व पदाधिकारी हे ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबईकरांकरिता घेतलेले धान्य मोफत वाटण्यात व्यस्त असतानाच नेरूळ-जुईनगर नोडमध्ये रवींद्र सावंत यांनी कोरोना काळात विविध लोकोपयोगी कामांचा धडाका लावत कॉंग्रेसच्या माध्यमातून जनसेवा सुरूच असल्याचे चित्र निर्माण केले. नेरूळ जुईनगरमधील १८०० गरजू परिवारांना नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी धान्य दिले. सुमारे महिनाभर २००० लोकांना अन्नवाटप सकाळ व संध्याकाळ असे दोन वेळा केले. नेरूळ सेक्टर २-४ व जुईनगर परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये स्वखर्चातून धुरीकरण करून दिले. द्राक्षे व कलिंगड शेतकऱ्यांच्या दरात रहीवाशांना उपलब्ध करून दिले. रहीवाशांना भाज्यांसाठी बाहेर फिरावे लागू नये म्हणून गृहनिर्माण सोसायट्यांमध्येच भाज्या उपलब्ध करून देण्याचे काम नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी केले. या कामात त्यांना नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी मोलाची मदत केली.