अॅड. महेश जाधव : Navimumbailive.com@gmail.com
मुंबई : मुख्यमंत्री पदाचा उमेदवार नामनियुक्त सदस्य नसावा तर विधिमंडळाच्या
कोणत्याही सभागृहाचा निवडून आलेला सदस्य असावा त्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
यांनी विधान परिषदेच्या ९ जागांसाठी त्वरीत निवडणूक घेण्याची शिफारस निवडणूक आयोगाला
केली, त्यानुसार आता २१ मे रोजी निवडणूक होत आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान
परिषदेचे सदस्य म्हणून निवडून निश्चित येतील. मात्र या वरून राज्यपालांवर टिका करण्याचा
निषेधार्ह प्रकार घडला तो गैर होता. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदार पदावरून
भाजप तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्य सरकार अस्थिर करीत असल्याचा
त्यांच्यावर झालेला आरोप चुकीचा आणि बिनबुडाचा आहे असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय
अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.
मुख्यमंत्री पदाचा उमेदवार निवडून आलेले सदस्य असावा, अशी भूमिका राज्यपालांची
होती त्यानुसार त्यांनी निवडणूक घेण्याची शिफारस केली, त्यानुसार निवडणूक होत आहे.
यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष दिले.असे असताना राज्य सरकारला अस्थिर करण्याचा
प्रयत्न भाजप करीत असल्याचा आरोप करणे चुकीचे आहे. भाजप आरपीआय कोणीही या सरकारला अस्थिर
करीत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोना विरुद्धचे युद्ध जिंकण्यासाठी
उद्धव ठाकरे यांनी चांगल्या प्रकारे प्रयत्न करावेत. रिपब्लिकन पक्ष त्यांच्या
चांगल्या प्रयत्नांना नेहमी पाठिंबा देईल असे रामदास आठवले म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे येत्या २१ मे रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत निश्चित निवडून येतील अश्या
माझ्या रिपब्लिकन पक्षातर्फे त्यांना शुभेच्छा देत असल्याचे रामदास आठवले यांनी कळविले
आहे.