अॅड. महेश जाधव : Navimumbailive.com@gmail.com
मुंबई : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आमदाराकीचा मार्ग मोकळा करण्याच्या हालचालीनंतर विधानपरिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्याच अनुषंगाने इच्छुकांनी मोर्चेबांधणीला आता सुरुवात केली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनीही पुन्हा एकदा आपल्या राजकीय पुनर्वसनाची इच्छा बोलून दाखवली आहे. मला महाराष्ट्राच्या राजकारणात रस आहे. त्यामुळे मला विधानपरिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी आपण पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. पक्ष त्याबाबत सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे, अशी माहिती खडसे यांनी दिली आहे.
राजकीय पुनर्वसनाबाबत खडसे यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला. मागच्या कालखंडात माझ्या नावाची राज्यसभेसाठी चर्चा होती. भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीने तशी शिफारस देखील केली होती. मात्र, मी राज्यसभेसाठी इच्छुक नव्हतो. तेव्हा राज्यसभेसाठी निवड होऊ शकली नव्हती. मात्र, मला महाराष्ट्राच्या राजकारणात रस आहे. त्यामुळे मला विधानपरिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी मी पक्षाकडे केली आहे. पक्ष त्याबाबत सकारात्मक निर्णय घेईल, असे खडसे म्हणाले.
खडसे यांनी यावेळी बोलताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भूमिकेचे समर्थन केले. मधल्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आमदारकीच्या विषयावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू होते. त्यावेळी सत्ता प्रस्थापित करण्यासंदर्भात विरोधकांकडून भाजपवर आरोप झाले ते चुकीचे असल्याचे खडसे म्हणाले. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून कोणाची निवड करावी, कधी करावी तसेच किती काळासाठी करावी, याचे सर्वस्वी अधिकार हे राज्यपालांना आहेत. त्यांनी जो निर्णय घेतला आहे, तो मान्य करून चालावे लागणार आहे, असे खडसेंनी सांगितले.
प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असून या दृष्टीने देखील उपाययोजना करण्याची गरज आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे, मास्क बांधावे, गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडावे, राज्य शासन आणि प्रशासनाला कोरोनाच्या लढ्यात सहकार्य करावे, असे आवाहन देखील खडसेंनी यावेळी केले.