नवी मुंबई : कोव्हीड १९ च्या उपाययोजनांच्या अनुषंगाने जाहीर लॉकडाऊन काळात गरजू मजूर, कामगार, विस्थापित कामगार, बेघर नागरिक, काळजी घेण्यास कोणी नसलेल्या दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक अशा नवी मुंबईकर नागरिकांच्या दोन वेळच्या जेवणाची काळजी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात येत असून दररोज साधारणत: २४ हजारहून अधिक नागरिकांना १७ कम्युनिटी किचनच्या माध्यमातून जेवण वितरित करण्यात येत आहे. याकामी विविध स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती यांचेही मौलिक सहकार्य महानगरपालिकेस मिळत आहे. अशाच प्रकारे काल रात्री नवी मुंबईतून मध्यप्रदेशातील रेवा तसेच झारखंडमधील हजारीबागकडे ट्रेनव्दारे रवाना होणाऱ्या ३५०० नागरिकांना भोजन व्यवस्था करून देणेबाबत ठाण्याचे तहसिलदार अधिक पाटील व मंडळ अधिकारी किरण भागवत यांचेमार्फत विनंती करण्यात आली होती. त्यास अनुसरून महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी तातडीने आदेश देत त्या ३५०० प्रवाशांना जेवणाची पॅकेट्स उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. त्या अनुषंगाने उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार आणि सहा. आयुक्त चंद्रकांत तायडे यांनी महानगरपालिकेच्या बेलापूर व नेरूळ येथील कम्युनिटी किचनव्दारे सहा. आयुक्त चंद्रकांत तांडेल व संजय तायडे यांच्या माध्यमातून हे फूड पॅकेट्स पनवेल रेल्वे स्टेशनवर तातडीने उपलब्ध करून दिले. बाहेरगांवी जाणाऱ्या प्रवाशांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून काळजी घेत उपलब्ध करून दिलेल्या या सेवेबद्दल समाधान व्यक्त केले.