नवी मुंबई : कोरोना काळात काम करणाऱ्या कंत्राटी कामगाराचे निधन झाल्यास कायम कामगारांच्या धर्तीवर नवी मुंबई महापालिकेने कंत्राटी कामगारांनाही मदत देण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे व नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेचे वाहन चालक राजेंद्र भवारी यांचा रविवार, दि. २४ मे रोजी कोविड-१९ ने निधन झाले. त्याच दिवशी वाशी विभाग कार्यालयात काम करणारे सफाई कामगार विजय दुर्गे यांचे निधन झाले. विजय दुर्गे हे गेली काही दिवस वाशीतील महापालिका प्रथम संदर्भ रूग्णालयात आठवडाभर उपचार घेत होते. भवारी व दुर्गे हे दोघेही कोरोना काळात महापालिका प्रशासनात कार्यरत होते. भवारी हे कायम कामगार व दुर्गे हे कंत्राटी कामगार होते. भवारी यांना निधनानंतर पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेज इन्श्युरन्स स्कीम फॉर हेल्थ वर्कस या केंद्र सरकाऱच्या पॅकेजअंर्तगत ५० लाख रूपये आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कामगार कल्याण निधीतून २५ लाख असे ७५ लाख रूपयेही भवारी यांच्या परिवारास देण्यात येणार आहे. तसेच भवारी यांच्या वारसास महापालिकेमध्ये नोकरीही देण्यात येणार आहे. परंतु दुर्गे यांच्या परिवारास यापैकी काहीही मिळणार नाही. यामुळे कंत्राटी कामगारांमध्ये संतापाची भावना पसरली असून दु्र्देवाने कोरोना काळात आपले बरेवाईट झाल्यास आपल्यानंतर आपल्या परिवाराला कोणीही वाली राहणार नसल्याची भीती त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. या मनस्थितीत नागरी समस्या सोडविण्याचे व नागरी सुविधा पुरविण्याचे काम कंत्राटी कामगारांकडून होणे अवघड असल्याची भीती रवींद्र सावंत यांनी निवेदनात व्यक्त केली आहे.
कोरोना काळातच भवारी व दुर्गे दोघांचेही निधन झाले. कोरोना काळात मृत झालेल्या दोन कामगारांना मिळणाऱ्या मदतीमध्ये इतका दुजाभाव यासाठी कारण भवारी कायम सेवेत होते तर दुर्गे हे कंत्राटी कामगार होते. मुळातच दोन्ही कामगार कोरोना काळात संघर्ष करत नवी मुंबईकरांची सेवा बजावत होते. नवी मुंबई महापालिकेत कंत्राटी तसेच ठोक मानधनावरील कामगार वर्षानुवर्षे काम करत आहेत. समान कामाला समान वेतन असेल तर कोरोना काळात कोणी कामगार मृत झाल्यास त्यास समान नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे कायम व कंत्राटी असा नुकसान भरपाईत मतभेद अथवा दुजाभाव न करता कायम कामगारांना जी नुकसानभरपाई मिळते, तीच नुकसान भरपाई कंत्राटी कामगारासही मिळणे आवश्यक आहे. दुर्गे या कंत्राटी कामगाराच्या परिवारास लवकरात पालिका प्रशासनाने नुकसान भरपाई जाहिर करावी. कोरोनाशी संघर्ष करताना कायम कामगारांच्या खांद्याला खांदा लावून कंत्राटी कामगारही काम करत आहे. याच कंत्राटी कामगारांमुळे पालिका प्रशासनाला पुरस्कार मिळाले आहेत, याचेही यानिमित्ताने पालिका प्रशासनाला विस्मरण होता कामा नये. नुकसान भरपाई देताना कायम व कंत्राटी असा कोणताही भेदभाव करणे योग्य नसल्याने दुर्गे यांच्या परिवारालाही पालिका प्रशासनाने नुकसान भरपाई जाहिर करावी आणि यापुढे कोरोनाशी लढताना कोणत्याही कामगाराचे दुर्देवाने निधन झाल्यास पालिका प्रशासनाने त्यांच्या परिवाराला मदत करताना पुढाकार घेण्याविषयी नवी मुंबई महापालिका प्रशासनाला आदेश देण्याची मागणी रवींद्र सावंत यांनी निवेदनात केली आहे.