नवी मुंबई : कोरोना पार्श्वभूमीवर राज्यातील खासगी रूग्णवाहिकांचे दर नियंत्रित करण्याची मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
जगाच्या कानाकोपऱ्यात कोरोना रोगाचा उद्रेक झालेला आहे. आपला देश अथवा आपले महाराष्ट्र राज्यही त्यास अपवाद राहीलेले नाही. कोरोना रूग्णांना हॉस्पिटलमध्ये घेवून जाण्यासाठी, त्यांना हॉस्पिटलमधून घरी नेण्यासाठी, अथवा उपचारादरम्यान या हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेवून जाण्यासाठी तसेच कोरोनाने मृत झाल्यास तो मृतदेह हॉस्पिटलमधून स्मशानभूमीपर्यत घेवून जाण्यासाठी रूग्णवाहिकांची आवश्यकता असते. राज्य सरकारची रूग्णालये. स्थानिक स्वराज्य संस्थांची रूग्णालये यांच्याकडे माफक प्रमाणावर रूग्णवाहिका उपलब्ध नसल्याने रूग्णांच्या नातेवाईकांना खासगी रूग्णवाहिकांचाच आधार घ्यावा लागत असल्याचे रवींद्र सावंत यांनी निवेदनातून मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
सध्या कोरोना रूग्णांकडून रूग्णवाहिकांकडून अव्वाच्या सव्वा लूट सुरू असल्याची ओरड महाराष्ट्रात सुरू आहे. तथापि कोरोना रूग्णाला घेवून जाण्यासाठी खासगी रूग्णवाहिकेच्या वाहन चालकास व सहाय्यकास स्वखर्चाने पीपीई किट विकत घ्यावी लागते. त्यामुळे या पीपीई किटचाही खर्च त्यांना रूगणवाहिकेच्या भाड्यातच जोडावा लागतो. कोरोना रूग्णास घेवून जाणाऱ्या रूग्णवाहिकांना सरकारकडून दोन मोफत पीपीई किट मोफत पुरविले गेल्यास त्यांनाही भाडे कमी आकारणे शक्य होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांनी रूग्णवाहिकांना मोफत पीपीई किट पुरविण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. त्या त्या रूग्णवाहिकांकडून कोरोना रूग्णांची माहिती भरून घेवून व खातरजमा करूनच त्यांना मोफत पीपीई किट उपलब्ध करून देण्यात यावे. मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री व परिवहन मंत्री यांनी या समस्येचे गांभीर्य जाणून एकत्रित बसून या समस्येवर तोडगा काढावा आणि खासगी रूग्णवाहिकांचे कोरोना काळात दर निश्चित करावे. जेणेकरून नागरिकांनाही दर माहिती होतील. त्यांचीही लुटमार होणार नाही आणि रूग्णाचे नातेवाईक व खासगी रूग्णवाहिका चालक यांच्यात होत असलेले वाद टळतील. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी खासगी रूग्णवाहिकांचे दर सरकारकडून लवकरात लवकर जाहिर करण्याची मागणी रवींद्र सावंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.