नवी मुंबई : महापालिका अधिकारी-कर्मचारी, आरोग्य विभागातील सर्वच कार्यरत घटक या सर्वाची तातडीने वैद्यकीय तपासणी करून घेण्याची मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.
जानेवारी महिन्यापासून आपल्या देशामध्ये कोरोनाने हातपाय विस्तारण्यास सुरूवात केली आहे. मार्चच्या अखेरीस कोरोनाने आपले खरे अक्राळविक्राळ रूप दाखविण्यास सुरूवात केली आहे. कोरोनाच्याविरोधात आज प्रशासन लढा देत आहे. नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा आरोग्य विभाग गेल्या तीन महिन्यापासून कोरोना विरोधात लढा देत आहे. नवी मुंबईकरांची सेवा करत आहे. ही बाब खरोखरीच प्रशंसनीय आहे. परंतु स्वत:चा व स्वत:च्या कुटूंबियांचा जीव धोक्यात घालून नवी मुंबईकरांची कोरोनाविरोधात सेवा करणाऱ्या महापालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांची तसेच आरोग्य विभागात कार्यरत असणाऱ्या सर्वाचीच काळजी घेणे आता नवी मुंबई महापालिका प्रशासनाचे कर्तव्य आहे. महापालिका प्रशासनाने कोरोनाचे गांभीर्य ओळखून आता त्यादृष्टीने पाऊले उचलणे आवश्यक असल्याचे रवींद्र सावंत यांनी म्हटले आहे.
महापालिका अधिकारी व कर्मचारी तसेच आरोग्य विभागातील सर्वच घटकांची महापालिका प्रशासनाने तातडीने वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे. त्यात कोणाला रक्तदाब व मधुमेहाचा त्रास असेल तर या कर्मचारी-अधिकाऱ्यांना तसेच आरोग्य विभागातील संबंधितांना कोरोना उपचार प्रक्रियेपासून लांब ठेवले पाहिजे. संबंधितांना कोरोनाचे काम देवू नये. या घटकांना कोरोनाची त्वरीत लागण होवून जीवितास धोका निर्माण होण्याची भिती आहे. आरोग्य विभागातील सर्वच घटक तसेच पालिकेचे कर्मचारी व अधिकारी यांची महापालिका प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तातडीने वैद्यकीय तपासणी करून घेण्याची मागणी रवींद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.