नवी मुंबई : कोरोनासाठी व बिगर कोरोना आजारावर उपचार करणाऱ्या नवी मुंबई शहरातील रूग्णालयांची यादी जाहिर करण्याची मागणी सारसोळे गावातील समाजसेवक मनोज यशवंत मेहेर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.
नवी मुंबई शहरात कोरोनाचा उद्रेक झालेला आहे. अनेक रूग्णालयामध्ये कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तथापि नवी मुंबईकरांना इतर आजारावरही रूग्णालयात जावून उपचार घ्यावे लागत आहेत. अनेकदा केवळ कोरोना सांगून अनेक रूग्णालयात रूग्णांना उपचारासाठी घेतले जात नाही. नवी मुंबईतील सर्वच खासगी दवाखाने व रूग्णालयांची महापालिेकेत नोंदणी करावी लागते. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडे सर्वच रूग्णालयांची इंत्यभूत माहिती असते. या पार्श्वभूमी नवी मुंबईकरांची रूग्णालयीन उपचार मिळविण्यासाठी होत असलेली गैरसोय पाहता महापालिका प्रशासनाने कोणत्या रूग्णालयात कोरोनाचे उपचार सुरू आहेत व कोणत्या रूग्णालयात अन्य आजारांच्या रूग्णांवर उपचार सुरू आहेत, याची तात्काळ प्रेसनोट काढावी. जनसंपर्क विभागाकडून ती प्रसिध्दी माध्यमांना गेल्यास नवी मुंबईकरांना कोरोना आजारावर उपचारासाठी कोणती रूग्णालये व अन्य आजारांसाठी कोणत्या रूग्णालयात उपचार होवू शकतात याची माहिती मिळेल. बिगर कोरोना आजाराच्या रूग्णांना रूग्णालयीन सेवा मिळविताना खूप त्रास सहन करावा लागत असल्याने तात्काळ ही माहिती प्रसिध्द करावी, व ही माहिती लवकरात लवकर प्रसिध्द करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाला तसे निर्देश देण्याची मागणी समाजसेवक मनोज मेहेर यांनी केली आहे.