नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेरूळ व जुईनगरमधील जनतेला आरोग्य सुविधा माफक प्रमाणात मिळत नसल्याने नेरूळ व जुईनगर परिसरात आरोग्य शिबिरे मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्याची मागणी नेरूळ ब्लॉक कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.
सध्या गेल्या चार महिन्यापासून नवी मुंबईकर कोरोनाशी लढा देत आहेत. मार्च महिन्याच्या मध्यापासून लॉक डाऊन जाहिर झाल्यानंतर नेरूळ व जुईनगरचे रहीवाशी घरातच बसून आहेत. विभागातील अनेक दवाखाने आज बंद झाले आहेत, जे दवाखाने सेवा देतात, तेही पूर्वीप्रमाणे दिवस रात्र न देता ठराविकच वेळ देत असल्याने नेरूळ व जुईनगरमधील रहीवाशांची गैरसोय होत आहे. सर्दी, खोकला, ताप हे आजार झाले तरी कोरोनाच्या भीतीने लोक त्यांच्याकडे संशयाने बघतात. लोकसंख्येच्या मानाने वैद्यकीय सुविधा आज कमी पडू लागली अहो. दवाखाने कमीच वेळ उघडे असल्याने व दवाखान्यात गेल्यावर लोकांची पाहण्याची संशयी वृत्ती यामुळे जनसामान्यांत एक भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे नेरूळ व जुईनगर परिसरातील विभागाविभागात तातडीने आरोग्य शिबिर राबविण्याची गरज आहे. रूग्णालयात जायचे म्हटले तर कोरोनाने अनेक रूग्णालयात गर्दी आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून नेरूळ व जुईनगरमधील जनतेची काळजी घेणे आवश्यक आहे. आमच्या म्हणण्यामागील कळकळ व रहीवाशांप्रती असलेली तळमळ आणि समस्येचे गांभीर्य पाहून नेरूळ व जुईनगर विभागात तातडीने महापालिका प्रशासनाने आरोग्य शिबिरे मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्याची मागणी रवींद्र सावंत यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.