
भास्कर गायकवाड
नवी मुंबई : कोरोनाचा उद्रेक सर्वत्र होत असतानाच नवी मुंबई शहरातील कोरोनाची आकडेवारीही वाढू लागल्याने नवी मुंबईकरांची चिंता वाढीस लागली आहे. आज महापालिका प्रशासनाकडून प्रसिध्द झालेल्या आकडेवारीनुसार शहरामध्ये एकाच दिवशी १५६ कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. कोरोना आजाराचा हा नवी मुंबई शहरातील आजवरचा उच्चांक आहे. यापूर्वी तीन वेळा शतकी मजल मारणाऱ्या या शहराने आज कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीमध्ये दीड शतकी मजल मारली आहे.
या १५६ कोरोनाग्रस्तांमध्ये बेलापूर नोडमध्ये ८, नेरूळ नोडमध्ये २४, वाशी नोडमध्ये १६, तुर्भे नोडमध्ये ४०, कोपरखैरणे नोडमध्ये १५, घणसोली नोडमध्ये १५, ऐरोली नोडमध्ये ३२, दिघा नोडमध्ये ६ जणांचा समावेश आहे. नवी मुंबईमध्ये कोरोना वगळता अन्य आजारांच्या उपचारासाठी हॉस्पिटलही उपलब्ध होत नसल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून पहावयास मिळत आहे. नवी मुंबईतील रूग्णालयांमध्ये आता मुंबईचे रूग्ण उपचारासाठी येवू लागल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.
कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यावरूनही वादाच्या घटना घडू लागल्या आहेत. नवी मुंबई शहराच्या कानाकोपऱ्यातील तसेच बाहेरील मृतदेहही नेरूळ सेक्टर २च्या सारसोळे शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येवू लागल्याने वादाचे प्रसंगही निर्माण झाले आहेत. सारसोळे गावातील समाजसेवक मनोज यशवंत मेहेर यांनी बाहेरील कोरोनाग्रस्त मृतदेह जाळून न देण्याची भूमिका घेत, स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावरच आपल्या विरोधाला ठाम राहील्याने गुपचूप आलेले कोरोनाग्रस्तांचे मृतदेह आजवर अंत्यविधीसाठी त्यांच्या निवासी भागात पाठवून देण्यात आले आहेत. कोरोनाग्रस्त मृतदेहांवरील अंत्यसंस्कार वादाचा विषय बनू नये म्हणून नवी मुंबई शहरामध्ये कोरोनाग्रस्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्वतंत्र स्मशानभूमीसाठी मनोज मेहेर गेल्या दोन महिन्यापासून महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे सातत्याने लेखी निवेदनातून पाठपुरावा करत आहे.