
भास्कर गायकवाड
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर दोन येथील शांतीधाम स्मशानभूमीत कोरोनाग्रस्तांवर अंत्यविधी झाल्यावर काही मिनिटातच स्मशानभूमीत जंतुनाशक फवारणी करण्याची मागणी सारसोळे गावचे भूमीपुत्र असणाऱ्या समाजसेवक मनोज मेहेर यांनी नेरूळ महापालिका विभाग अधिकारी सोमनाथ आडव यांच्याकडे केली आहे.
गुरूवारी सारसोळे गाव स्मशानभूमीत नेरूळ सेक्टर सहामधील एका वृध्देवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्यांचा पाढा मनोज मेहेर यांच्यापुढे वाचून दाखविला. अंत्यविधीस वेळ लागणार असल्याचे पाहून मनोज मेहेर यांनी तात्काळ नेरूळ विभाग कार्यालयात धाव घेतली आणि विभाग अधिकाऱ्यांशी चर्चा करताना, सारसोळे स्मशानभूमीत कोरोनाग्रस्तांवर अंत्यविधी झाल्यावर तात्काळ महापालिका प्रशासनाने स्मशानभूमीत जंतुनाशक फवारणी करणे आवश्यक असल्याचे आडव यांच्या निदर्शनास आणून दिले. महापालिका प्रशासनाकडून कोरोनाग्रस्तांवर अंत्यविधी झाल्यावरही जंतुनाशक फवारणी होत नसल्याचे सांगत मनोज मेहेर यांनी नाराजी व्यक्त केली. यावर विभाग अधिकारी आडव यांनी संबंधितांना तात्काळ दालनात बोलवित कोरोनाग्रस्तांवर अंत्यविधी होताच स्मशानभूमीमध्ये जंतुनाशक फवारणी करून घेण्याचे निर्देश दिले.
नवी मुंबईत कोरोनाग्रस्त मृतदेहांवर अंत्यविधी हा वादाचा विषय बनत चालला आहे. नवी मुंबईच्या कानाकोपऱ्यातील तसेच बाहेरील भागातील कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहावर अंत्यविधीसाठी नेरूळ सेक्टर दोनमधील सारसोळे स्मशानभूमीत पाठविले जात असे. पालिका अधिकारी तसेच नगरसेवक वर्गही स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना फोन करून अंत्यविधी करण्याचे निर्देश देत होते. या पार्श्वभूमीवर सर्वप्रथम मनोज मेहेर यांनी बाहेरील कोरोना मृतदेहांवर अंत्यविधी करण्यास नकार देत आपल्या भूमिकेवर ठाम राहीले. कोरोनाग्रस्तांचे बाहेरील परिसरातील मृतदेह सारसोळे स्मशानभूमीत आणले असता, मनोज मेहेर यांनी अंत्यसंस्कारास विरोध करत संबंधित मृतदेह त्यांच्या त्या त्या निवासी भागात पाठवून दिले. नवी मुंबईत कोरोनाग्रस्तांच्या अंत्यविधीसाठी स्वतंत्र स्मशानभूमीच्या मागणीसाठी मनोज मेहेर पालिका प्रशासन ते मंत्रालय सातत्याने पाठपुरावा करत आहेत. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनांचा मनोज मेहेर यांनी रतीबही घातलेला आहे.