
नवी मुंबई : नगरसेवक नसतानाही नवी मुंबई शहरामध्ये ‘नगरसेवक’ उपाधी लावून जनसामान्यांमध्ये वावरणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी समाजसेवक मनोज मेहेर यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका ९ मे २०२० रोजी बरखास्त झाली असून सभागृह तसेच सभागृहातील लोकप्रतिनिधी यांचाही कालावधी संपुष्ठात आलेला आहे. सध्या आपण महापालिका प्रशासनावर प्रशासक म्हणून कार्यभार सांभाळत असून नवी मुंबई शहरात नागरी सुविधांची व नागरी समस्या सोडविण्याची कामे आपल्याच मार्गदर्शनाखाली होत आहेत. पाचव्या सभागृहात कार्यरत असणारे नगरसेवक आता नगरसेवक राहीलेले नसून ते सर्व आता माजी नगरसेवक झालेले आहेत. तथापि यामधील अनेक माजी नगरसेवक आजही सार्वजनिक ठिकाणी, बॅनरवर तसेच जनसामान्यांमध्ये नगरसेवक म्हणूनच वावरत आहेत. आज पोलिस नसून पोलीस म्हणून वावरणाऱ्या तोतया पोलिसाला अटक होते, गुन्हा दाखल होवून शिक्षा होते. नगरसेवक नसतानाही माजी नगरसेवकांनी नगरसेवक म्हणवून मिरविणे हा तोतयेगिरीचाच एक प्रकार आहे. जनतेची फसवणूक करण्याचा प्रकार आहे. आज माजी असणारे हे नगरसेवक एकप्रकरे तोतयेगिरीच करत असून प्रसिध्दी माध्यमांमध्येही स्वत:चा उल्लेख ते नगरसेवक म्हणूनच करत आहेत. सोशल मिडियावरही हे खऱ्या अर्थाने तोतये असणारे आजही आपला नगरसेवक म्हणून उल्लेख करत आहेत. अशा तोतयेगिरीला कोठेतरी आळा बसणे आवश्यक आहे. त्यामुळे नगरसेवक म्हणून वावरताना कोणी माजी नगरसेवक जनसामान्यांमध्ये आढळल्यास अथवा सोशल मिडियामध्ये नगरसेवक म्हणून स्वत:ची मार्केटींग करत असल्यास त्यांच्यावर पालिका प्रशासनाच्या वतीने फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना शासन करावे. जो नियम तोतया पोलिस, तोतया शासकीय अधिकाऱ्यांना लावून त्यांना जेलमध्ये टाकतो, तोच निकष या तोतया नगरसेवकांनाही लावावा व दंडीत करावे अशी मागणी समाजसेवक मनोज मेहेर यांनी केली आहे.