
नेरूळ सेक्टर दोन मधील एलआयजी वसाहतीचे प्रकरण
नवी मुंबई : नेरूळ दोन मधील एलआयजी वसाहतीमधील बैठ्या चाळीमध्ये मल:निस्साण वाहिन्यामुळे निर्माण झालेल्या समस्या सोडविण्याची मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष व नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत आणि नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.
नेरूळ सेक्टर २ परिसरामध्ये एलआयजी वसाहत असून या वसाहतीमध्ये पूर्णपणे बैठ्या चाळींचा समावेश होत आहे. काही वर्षापूर्वी महापालिका प्रशासनाकडून या ठिकाणी मल:निस्सारण वाहिन्या टाकण्यात आल्या होत्या. हे काम त्याचवेळी अंत्यत निकृष्ठ पध्दतीचे करण्यात आले होते. या कामाबाबत आम्ही त्याचवेळी महापालिका प्रशासनाच्या निदर्शनासही आणून दिलेही होते. रहीवाशांच्या दरवाजातच या मल:निस्सारण वाहिन्यांचे झाकण (चेम्बर्स) आहे व त्याबाजूलाच पाण्याचे मीटरही आहे. हे मल:निस्सारण वाहिन्यांचे चेम्बर्स नेहमीच तुंबलेले (चोकअप) असते. यामुळे रहीवाशांना बाराही महिने दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी निवासी वास्तव्य करणारा रहीवाशी वर्ग हा अत्यल्प उत्पन्न गटातील श्रमिक आहे. त्यांना बाराही महिने या दुर्गधीचा सामना करावा लागत असल्याने त्यांच्या आरोग्याला नकळत पालिका प्रशासनाच्या उदासिनतेमुळे धोका निर्माण झालेला आहे. या चेम्बर्समधील पाणी आपणास पावसाळी गटारांमधून बाराही महिने वाहताना पहावयास मिळत असल्याचे नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष व नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत आणि नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
समस्या गंभीर आहे. या मल:निस्सारण वाहिन्यांची तात्काळ डागडूजी होणे आवश्यक आहे अथवा नव्याने टाकणे काळाची गरज आहे. या दुर्गंधीयुक्त वातावरणात रहीवाशांचे बळीही जाण्याची भीती आहे. आता पावसाळ्यात यामुळे साथीच्या आजारांचाही उद्रेक होण्याची भीती आहे. त्यामुळे आपण स्वत: येवून या विभागात पाहणी अभियान राबविल्यास समस्येचे गांभीर्य आपल्या निदर्शनास येईल. लवकरात लवकर या समस्येचे निवारण करावे अशी मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष व नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत आणि नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी केली आहे.