नवी मुंबई : सोसाट्याच्या वाऱ्यामुळे प्रभाग ९६ व ९७ मध्ये पडझड झालेल्या झाडांच्या फांद्या व पालापाचोळा त्वरीत उचलण्याची मागणी समाजसेवक गणेश भगत यांनी महापालिकेचे नेरूळ विभाग अधिकारी सोमनाथ आडव यांच्याकडे केली आहे.
बुधवारी, ३ जून रोजी झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे प्रभाग ९६ व ९७ मध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षांची पडझड झालेली आहे. नेरूळ नोडमध्ये या घटनेमुळे वृक्षांची पडझड व फांद्या केवळ याच दोन प्रभागात सर्वाधिक पडल्या आहेत. महापालिकेकडे मनुष्यबळ कमी असल्याने आम्ही, आमच्या मित्रपरिवाराने या झाडाच्या फांद्या तोडून रस्त्यावरील व पदपथावरील अडथळे दुर केले आहेत. आज या घटनेला आठवडा पूर्ण होत आला आहे. पालिका प्रशासनाने त्या पडझडीत पदपथावर असलेल्या फांद्या, पालापाचोळा अद्यापि हटविला नाही. यामुळे स्थानिक रहीवाशांना पदपथावरून चालताना त्रास होत आहे. यामुळे ९६ आणि ९७ या दोन्ही प्रभागांना बकालपणाही आलेला आहे. हा कचरा वेळीच न हटविला गेल्यास साथीच्या आजारांचाही उद्रेक होण्याची भीती गणेश भगत यांनी निवेदनातून व्यक्त केली आहे.
समस्येचे गांभीर्य, परिसराला आलेला बकालपणा, साथीच्या आजाराची भीती या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर या झाडांच्या फांद्या हटवून स्थानिक रहीवाशांना दिलासा द्यावा असे गणेश भगत यांनी विभाग अधिकारी आडव यांच्याशी चर्चा करताना म्हटले आहे.