नवी मुंबई : नेरूळ पश्चिमेला पालिका प्रशासनाकडून तीन वार्डात कोविड १९ मास स्क्रिनिंग शिबिर सुरू आहे. त्यासाठी रहीवाशांऐवजी सर्वच पक्षाचे इच्छूक उमेदवार ठिय्या मांडून बसल्याने निवडणूकीसाठि मतदारासमोर येण्यासाठी ही लाचारी असल्याची टीका आता रहीवाशांकडूनच करण्यात येत आहे. ज्यांनी कॅम्पसाठी पाठपुरावा केला आहे, त्यांनी उभे राहीले तर समजण्यासारखे आहे. बाकीचे कशाला आयत्या बिळावर नागोबा बनायला आलेत अशी टीका स्थानिक रहीवाशांकडून करण्यात येत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या प्रभागात हा कॅम्प लावावा यासाठी कॉंग्रेसच्या रवींद्र सावंत, विद्या भांडेकर आणि भाजपच्या सुहासिनी नायडू, ज्येष्ठ माजी नगरसेविका स्नेहा पालकर यांनी प्रशासन दरबारी प्रभाग ८४ करीता पाठपुरावा केला होता. प्रभाग ८६ करीता भाजपच्या मनोज मेहेर यांनी प्रशासन व मंत्रालयदरबारी या कॅम्पकरीता निवेदनाचा रतीब लावला होता. प्रभाग ९६ मध्ये भाजपच्या गणेश भगतांचा कॅम्पसाठी पाठपुरावा जगजाहिर आहे. तथापि ज्या राजकीय घटकांनी काडिमात्र पाठपुरावा केला नाही, ते मात्र कॅम्पच्या ठिकाणी हजेरी लावून जनतेत आपले हसे करून घेत आहेत. निवडणूका पाच महिन्यांनी होणार असल्याने जनतेसमोर येण्याचा हे ‘नागोबा’ केविलवाणा प्रयत्न करत असले तरी जनतेकडून मात्र त्यांच्यावर टीका सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी फोटोसेशन करून हे ‘नागोबा’ जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न करत असले तरी सोशल मिडीयामुळे या नागोबाचे काही काम न करता केवळ प्रसिध्दीसाठीचे हे विषारी फुत्कार जनतेच्या निदर्शनास आले आहे.
पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी तात्काळ शिबिराला जमत असलेली राजकीय गर्दी थांबवून या नागोबंच्या विळख्यातून अशा कॅम्पला लांब ठेवण्याची व कॅम्पपासून सर्वच राजकारण्यांना दूर ठेवण्याची तजवीज करण्याची मागणी आता जनतेकडूनच केली जात आहे. प्रभाग ८६ च्या कॅम्पसाठी भाजपच्या मनोज मेहेरने पालिका आयुक्तांना चार, पालिका अतिरिक्त आयुक्त, आरोग्य विभाग उपायुक्त, आरोग्य अधिकारी, मुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांनाही निवेदन दिल्याचे सारसोळेच्या ग्रामस्थांना व नेरूळ सेक्टर सहाच्या रहीवाशांना माहिती असल्याने इतरांच्या प्रसिध्दीचा फारसा फायदा होणार नसल्याचे स्थानिक रहीवाशांमध्ये सांगितले जात आहे.
निवडणूका जवळ आल्या असल्याने आपल्या प्रभागात गेल्या पाच वर्षात काडीमात्र काम न केलेले घटक आता प्रसिध्दीसाठी कोणत्याही थराला जावू लागल्याने जनसामान्यांमध्ये या आयत्या बिळाच्या मालकाची प्रतिमा मलीन होवू लागली आहे. कोविड कॅम्प राजकारण्यांसाठी प्रसिध्दीचा अड्डा बनू लागल्याने पालिका आयुक्तांनी याची दखल घेण्याची मागणी रहीवाशांकडून करण्यात येत आहे.