नवी मुंबई : नवी मुंबईत करोनाबाधितांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होत असून मृतांची संख्याही दररोज वाढत आहेत. वाढत्या संसर्गामुळे शहरात एकूण १२ ठिकाणी टाळेबंदी करण्यात आली आहे. शहरात आज १७८ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील करोनाग्रस्तांची संख्या ६६०५ इतकी झाली आहे.
नवी मुंबईत करोनामुळे आज चार जणांचा मृत्यू झाला. तर त्यामुळे आत्तापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २११ इतकी झाली आहे. शहरात करोना झालेले रुग्ण बरे होण्याचं प्रमाण चांगलं आहे. ६ हजार ६०५ रुग्णांपैकी आत्तापर्यंत ३ हजार ७५४ रुग्ण बरे झाले आहेत. तर १३६१ करोना चाचणी अहवाल प्रलंबित आहेत.
ठाण्यात १२ जुलैपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. करोना प्रतिबंधित क्षेत्र अर्थात कंटेन्मेंट झोनमध्येही लॉकडाउनचे नियम हे पूर्वीसारखेच करण्यात आले आहेत. तर इकडे नवी मुंबईतही १२ ठिकाणी टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. लोकांनी मास्क घालूनच बाहेर पडावं, हँड सॅनेटायझरचा वापर करावा, वारंवार हात धुवावेत, गरज असेल तरच बाहेर पडावं या प्रकाराच्या सूचना महापालिका प्रशासनाने दिल्या आहेत.