नवी मुंबई : महापालिका प्रभाग ७६ मधील सानपाडा सेक्टर २,३,४,८ परिसरातील रहीवाशांना व व्यावसायिकांना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून अवाजवी व भरमसाठ विद्युतदेयके आली आहेत. त्यातच एप्रिलपासून वीजदरवाढ केल्याने रहीवाशी त्रस्त व संतप्त झाले आहेत. अवाजवी वीजदेयके मागे घेवून सुधारीत देयके पाठवावीत तसेच करण्यात आलेली अन्यायकारक वीज दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी सानपाडा येथील स्थानिक भाजप नेते पाडूंरंग आमले यांनी आज लेखी निवेदनातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याच समस्येबाबत पाडूंरंग आमले यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनाही स्वतंत्र लेखी निवेदन दिले आहे.
महापालिका प्रभाग ७६ मध्ये सानपाडा सेक्टर २,३,४,८ परिसराचा समावेश होत आहे. या परिसरात सिडकोच्या गृहनिर्माण सोसायट्यांचा समावेश होत आहे. येथील रहीवाशी अत्यल्प व अल्प उत्पन्न गटातील रहीवाशांचा समावेश आहे. मध्य उत्पन्न गटातील रहीवाशांचे प्रमाण अत्यल्प व तुरळक आहे. सध्या कोरोनामुळे आमच्या प्रभागातील रहीवाशी विकासासाठी नाही तर स्वत:च्या अस्तित्वासाठी, जीव वाचविण्यासाठी संघर्ष करत असल्याचे पाडूंरंग आमले यांनी मंत्रालयीन पातळीवर निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे.
सध्या वीज वितरण कंपनीकडून देयकाच्या नावाखाली होत असलेल्या पिळवणूकीमुळे रहीवाशी त्रस्त झाले आहेत. भरमसाठ देयके आल्याने रहीवाशी संतप्त झाले आहेत. कोरोनामुळे अनेक रहीवाशी गावी गेल्याने सदनिका बंद असतानाही भरमसाठ देयके आली आहेत. अनेक रहीवाशांनी वीजबिले भरलेली असतानाही त्यांना वीजबिले पुन्हा अव्वाच्या सव्वा पाठविली आहेत. मुळातच मिटर रिडींग झालेले नसताना सरासरीच्या आधारावर विद्युत देयके पाठविण्यात आल्याचे वीज वितरण कंपनी सांगत असली तरी पूर्वीची वीज देयके व आता आलेली देयके यात जमिन आसमानचा फरक असल्याचे पाडूंरंग आमले यांनी निवेदनात म्हटले आहे.
एकतर अनेक रहीवाशांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. कंपन्या-कारखाने बंद आहेत. कोरोनामुळे कामावर जाता न आल्याने रहीवाशांचे पगारही झालेले नाहीत. तसेच दळणवळणाची सोय नसल्याने रहीवाशांना आताही कामावर जाता येत नाही. कोरोना काळात वीज वितरण कंपनीने सौजन्य दाखविण्याऐवजी एप्रिलपासून वीज दर वाढवून आमच्या रहीवाशांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. अव्वाच्या सव्वा वीजदेयके आकारणे, नियमित वीजदेयके भरूनही पुन्हा नव्याने भरमसाठ वीजदेयक पाठविणे या समस्येने वीज बिल भरायचे कसे या समस्येने रहीवाशी चिंताग्रस्त झाले आहेत. अर्थकारणापासून वंचित असलेला व जगण्यासाठी संघर्ष करणारा सानपाडा नोडमधील प्रभाग ७६ च्या सानपाडा सेक्टर २,३,४, आणि ८ मधील रहीवाशी वीज वितरण कंपनीच्या अवाजवी देयक पाठविण्याच्या प्रकाराने त्रस्त व संतप्त झाला असून उद्या कदाचित वीज कंपनीचा कोणीही कर्मचारी रिडींग घेण्यासाठी व देयक भरण्यासाठी आल्यास रहीवाशी त्यांना शिवीगाळ करण्याची व वेळप्रसंगी संबंधित मारहाणही करण्याची भीती पाडूंरंग आमले यांनी व्यक्त केली आहे.
आपण या राज्याचे प्रमुख आहात. अवाजवी आलेल्या देयकांबाबत संबंधितांना आढावा घेण्याचे निर्देश द्यावेत. कोरोना काळात परिस्थिती भयावह झालेली आहे. एप्रिलपासून झालेली दरवाढ मागे घेवून आम्हाला उपकृत करावे. कृपय्या सानपाडा नोडमधील प्रभाग ७६ च्या सानपाडा सेक्टर २,३,४, आणि ८ मधील रहीवाशांची अवाजवी आलेल्या वीजदेयकाच्या जाचातून आमची सुटका करून रहीवाशांना दिलासा द्यावा, ही आपणास नम्र विनंती! सध्याची परिस्थिती आपण जाणून आहात. अवाजवी देयक पाठवून तसेच वीज दरात वाढ करून राज्य सरकारचा कोणता लोकल्याणाचा हेतू याबाबत महाराष्ट्रीयन जनताच आता संभ्रमात पडली आहे. याच विषयावर आपणास ३ जुलै रोजीही निवेदन सादर केले आहे. समस्येचे गांभीर्य पाहता लवकरात लवकर पाऊले उचलून प्रभाग ७६ मधील रहीवाशांना दिलासा देण्याची मागणी पाडूंरंग आमले यांनी केली आहे.
या समस्यानिवारणासाठी भाजपचे सानपाड्यातील स्थानिक नेते पाडूंरंग आमले यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना यापूर्वी ३ जुलै रोजी स्वतंत्र लेखी निवेदन दिले आहे.