नवी मुंबई : वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रभाग 85 मधील नेरूळ सेक्टर 6 अथवा कुकशेत गावात ‘कोविड -19 मास स्क्रिनिंग शिबिर’ राबविण्याची लेखी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेरूळ तालुका अध्यक्ष महादेव पवार यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.
प्रभाग 85 मध्ये नेरूळ सेक्टर सहा परिसर व कुकशेत गावाचा समावेश होत आहे. कालच नेरूळ सेक्टर सहा परिसरात 7 कोरोनाचे रूग्ण सापडले आहेत. नेरूळ सेक्टर सहामध्ये आणि कुकशेत गावातही कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. यामुळे नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांमध्ये आणि कुकशेत गावातील ग्रामस्थांमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रमाणामुळे भीतीचे वातावरण आहे. सभोवतालच्या 84, 86,87, 95, 96,97 सर्वच प्रभागामध्ये ‘कोविड -19 मास स्क्रिनिंग शिबिर’ आयोजित करण्यात आले होते. हे कॅम्प सर्व नेरूळमध्ये झाले असताना आमच्या प्रभाग 85 मध्ये कोरोना रूग्ण वाढत असतानाही ‘कोविड -19 मास स्क्रिनिंग शिबिर’ आयोजित का केले जात नाही. नेरूळ सेक्टर सहाचे रहीवाशी व कुकशेतचे ग्रामस्थ नवी मुंबईकर नाहीत का, ते करदाते नाहीत का? मग कुकशेतचे ग्रामस्थ व नेरूळ सेक्टर सहाच्या रहीवाशांवर कोरोना वाढत असतानाही दुजाभाव का, अन्याय कशासाठी? महापालिकेत आमच्या प्रभागाला कोणी वाली नाही का? समस्येचे गांभीर्य लक्षात घेवून तातडीने ‘कोविड -19 मास स्क्रिनिंग शिबिर’ राबविण्याची मागणी महादेव पवार यांनी केली आहे.