नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील उंब्रज नंबर एक या ठिकाणी नाकाबंदीवर असलेल्या पोलिसांबरोबर झालेल्या भांडणात पती आणि पत्नी विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये महिलेचा मृत्यू झाल्यामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे आहे ही घटना मंगळवारी ( दि ७) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत ग्रामस्थांकडून मिळालेली माहिती अशी की, उंब्रजमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडल्यामुळे हे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून शासनाने घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे गावातील रस्त्यांवर पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आलेली आहे. या नाकाबंदी दरम्यान येथील रोहिदास उर्फ बाबू कुशाबा शिंगोटे व त्यांची पत्नी अनुजा रोहिदास शिंगोटे यांची नाकाबंदी दरम्यान गावात जाण्यावरून शाब्दिक चकमक झाली. परंतु पोलिसांनी त्यांना जाण्यास मज्जाव केला त्यानंतर पती पत्नी व पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक उडाली यावेळी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ जमा झाले होते. या ग्रामस्थांनी विनंती करूनही पोलिसांनी त्यांना गावात जाण्यास मज्जाव केला, त्यानंतर त्या ठिकाणी जमलेल्या नागरिकांनी गावच्या सरपंच तसेच पोलिस पाटील व ग्रामपंचायत सदस्यांना फोन लावला. त्यानंतर काही वेळातच हे सर्वजण त्या ठिकाणी हजर झाले. सरपंचांनी पोलिसांना त्या दोघांना त्या ठिकाणाहून आत सोडण्याची विनंती केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या विनंतीला न जुमानता त्या पती पत्नीला जाण्यास मज्जाव केला . त्यानंतर रोहिदास शिंगोटे यांनी खिशातील औषधाची बाटली काढून तोंडाला लावली त्याचवेळी त्यांच्या मुलाने त्यांचा हात झटकला व ती बाटली खाली जमिनीवर पडली व तीच खाली पडलेली बाटली उचलून त्यामधील औषध त्यांच्या पत्नीने प्राशन केले. हा प्रकार काही क्षणातच घडल्यामुळे उपस्थित सर्वांना धक्काच बसला या घटनेनंतर त्यांना उपचारासाठी तात्काळ ओतूर येथे नेण्यात आले मात्र तत्पूर्वीच अनुजा शिंगोटे यांचा मृत्यू झाला तर रोहिदास शिंगोटे यांना पुढील उपचारासाठी नारायणगाव येथील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत या घटनेनंतर येथील ग्रामस्थ व नातेवाईक आक्रमक झाले होते, जोपर्यत सबंधित पोलिसांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. रात्री उशिरा प्रांतअधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.