नवी मुंबई : महावितरणने वाढीव वीजबिलांचा शॉक दिल्याने नागरिक अडचणीत सापडले आहेत. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ५०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे आश्वासन पाळले नाही. लॉकडाऊनच्या कालावधीत जवळपास सर्वच उद्योग, व्यवसाय बंद असल्याने नागरिकांवर आर्थिक संकट ओढवलेले आहे. त्यामुळे नागरिकांची वाढीव वीजबिले रद्द करून त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी नवी मुंबईचे शिल्पकार, ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व ऐरोली मतदारसंघाचे आमदार लोकनेते गणेश नाईक यांनी केली आहे.
राज्यात वाढीव वीज बिलांचा मुद्दा चर्चेचा विषय आहे. या वाढीव विजबिलांविरोधात भाजपने नवी मुंबईत आंदोलन छेडले आहे. भाजप आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी ५०० युनिट पर्यंतची वीज बिले माफ करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता नागरिकांची वीजबीले माफ करण्याचे तर दुरच उलट त्यांच्या वीज वापरापेक्षा जास्त बिले आली आहेत. त्यामुळे गणेश नाईक यांनी वीजमंत्र्यावर टीका करत वीजबिले रद्द करण्याची मागणी केली आहे. वीजबिले रद्द न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा नाईकांनी दिला आहे.
लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यानंतर कोणत्याही प्रकारचे रीडिंग न देता ग्राहकांना सरसकट वीज बिले दिली गेली. बंद केलेली घरे, कित्येक दिवसापासून बंद असलेली दुकाने यांनाही वाढीव विजेची बिले मिळाली आहेत. त्यामुळे अगोदरच आर्थिक संकटात असलेले नागरिक आणखी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे राज्य शासनाने त्वरित या प्रकरणाकडे लक्ष द्यावे व लोकांना दिलासा द्यावा, असेही नाईक यांनी म्हटले आहे.
यावेळी गणेश नाईकांसोबत माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व माजी नगरसेवक मोठ्या संख्येने हजर होते.