नगरसेवकांच्या घरवापसीचा शिवसेनेचा आनंद ठरला क्षणिक
नगर : महाविकास आघाडीच्या भूमिकेमुळे पुन्हा शिवसेनेत परण्याची वेळ आलेल्या पारनेर नगर पंचायतीच्या नगरसेवकांनी आता शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांना थेट टार्गेट केले आहे. आमचा राग शिवसेनेवर नाही, तर औटी यांच्यावर असल्याचे सांगत औटी शिवसैनिक नव्हे तर कम्युनिस्ट विचारांचे आहेत, असा आरोप केला आहे. पक्षाच्या हितासाठी औटी यांची शिवसेनेतून हक्कालपट्टी करावी, अशी मागणीच या नगरसेवकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे. यामुळे आता शिवसेनेच्या नेतृत्वापुढे नवा पेच निर्माण झाला आहे.
शिवसेनेत परत आलेल्या या नगरसेवकांनी आता औटी यांनाच पक्षविरोधी ठरवत त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख उषा बोरूडे यांच्यासह नगरसेवक डॉ. मुद्दिसर सय्यद, नंदकुमार देसमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी व नंदा देशमाने यांनी हे निवेदन पाठविले आहे.
यासंबंधी निवेदनात म्हटले आहे की, ‘पारनेर तालुक्याचे कम्युनिस्ट पक्षाचे पहिले आमदार भास्करराव औटी यांचे विजय औटी चिरंजीव आहेत. त्यामुळे यांची विचारसरणी आजही कम्युनिस्ट आहे. १९८५ मध्ये औटी यांनी समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढविली होती. त्यात ते पराभूत झाले होते. त्यानंतर काँग्रेसच्या माध्यमातून राजकारण करताना त्यांनी नेहमीच शिवसैनिकांना शिव्यांच्या लाखोल्या वाहिल्या. काँग्रेसकडून विधानसभेची उमेदवारी मिळत नसल्याने स्वार्थासाठी त्यांनी २००४ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. शिवसैनिकांच्या जीवावर ते विजयी झाले. मात्र, शिवसैनिकांची सतत हेटाळणी करीत राहिले. आमदार झाल्यापासून त्यांनी तालुक्यात शिवसेनेची एकही शाखा उघडली नाही. शिवसेनेच्या द़ृष्टीने भावनिक आणि महत्वाचे मुद्दे उपस्थित करूनही या नगरसेवकांनी औटी यांना उघड पाडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासंबंधी निवेदनात म्हटले आहे की, ‘शिवसैनिकांचे श्रद्धास्थान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त औटी यांनी कधीही उपक्रम घेतले नाहीत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर अभिनंदनाचे फलक लावले नाहीत. पक्षाच्या मुखपत्राला जाहिरातींची मदत केली नाही. शिवसेना प्रमुखांच्या अस्थी तालुक्यात आल्या असता औटी दर्शनालाही आले नाहीत. अस्थींची मिरवणूक काढून सत्ता मिळत नसते अशी दर्पोक्ती करून शिवसैनिकांना अपमानित केले. औटी यांच्या वाढिवसानिमित्त उद्धव ठाकरे पारनेरला आले होते. तेव्हा औटी यांनीच त्यांच्या ताफ्यावर दगडफेक घडवून आणली आणि लंके यांच्या समर्थंकांनी केल्याचे भासवून लंके यांची पक्षातून हकालपट्टी केली. पंधरा वर्षे शिवसेनेकडून पद उपभोगल्यानंतरही ते पक्षविरोधी भूमिका घेत असतात. विधानसभा निवडणुकीत त्यांचा साठ हजार मतांनी पराभव झालेला आहे. त्यांची पक्षातून हकालपट्टी करून निष्ठावान शिवसैनिकाकडे पक्षाची धुरा सोपवावी. अन्यथा तालुक्यात एकही शिवसैनिक शिल्लक राहणार नाही.’
राष्ट्रवादीत गेलेले नगरसेवक परत आणल्याचा आनंद क्षणिक टिकला. आता औटी यांच्या विरुद्ध कारवाई केली तर या नगरसवेकांचे पर्यायाने राष्ट्रवादीचे ऐकले असे होईल. तर दुसरीकडे औटी यांच्याबद्दल एवढी माहिती जाहीर होऊनही खपवून कसे घेतले, असा संदेश जाण्याची भीती आहे, अशी कोंडी शिवसेनेची झाली आहे.