दिपक देशमुख
नवी मुंबई : सानपाडा, प्रभाग ७६ मध्ये नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीने मंगळवार, दि. १५ जुलै रोजी कोविड १९ – मास स्क्रिनिंग कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपचे स्थानिक नेते पांडुरंग आमले हे या परिसरात मास स्क्रिनिंग कॅम्पचे आयोजन व्हावे यासाठी पालिका प्रशासन ते मंत्रालयीन पातळीपर्यत पाठपुरावा करत होते. बेलापुरच्या भाजप आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी याप्रकरणी पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क करून या प्रभागात मास स्क्रिनिंग कॅम्प आयोजित करण्याचे निर्देश दिले.
सानपाडा नोडमध्ये विशेषत: प्रभाग ७६ मध्ये कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहून परिसरातील रहीवाशांची कोविड चाचणी करण्याकरिता पालिका प्रशासनाने कोविड-१९ : मास स्क्रिनिंग कॅम्प आयोजित करावा यासाठी सानपाड्यातील भाजपा नेते पांडूरंग आमले हे गेल्या दीड महिन्यापासून पालिका आयुक्त, अतिरक्त आयुक्त, महापालिका आरोग्य उपायुक्त, आरोग्य अधिकारी, मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री या सर्वाकडे पाठपुरावा करत होते. पांडूरंग आमले यांनी याप्रकरणी भाजपचे नवी मुंबई महासचिव विजय घाटे यांच्याशी व त्यांच्या माध्यमातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्याशी संपर्क साधत त्यांना निवेदन सादर केले. आमदार मंदाताई म्हात्रे यांनी कोविड १९ – मास स्क्रिनिंग कॅम्प आयोजनासाठी सव्वा ते दीड महिना पाठपुरावा करावा लागतो काय याबाबत महापालिका प्रशासनाला फैलावर घेत तात्काळ कोविड १९ – मास स्क्रिनिंग कॅम्पचे आयोजन करण्याचे निर्देश दिले.
मंगळवार, दि. १५ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत सानपाडा सेक्टर ८ मधील केमिस्ट भवनमध्ये या कोविड १९ – मास स्क्रिनिंग कॅम्पचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील रहीवाशांनी मोठ्या संख्येने या कॅम्पमध्ये सहभागी होवून कोविडबाबतची तपासणी करून घेण्याचे आवाहन सानपाड्यातील भाजप नेते पांडूरंग आमले यांनी केले आहे.