भास्कर गायकवाड
नवी मुंबई : नेरूळ नोडमधील महापालिका प्रभाग ८५ व ८६ मध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने दोन्ही प्रभागात महापालिका प्रशासनाने डोअर टू डोअर मोफत स्क्रिनिंग कॅम्पचे आयोजन करण्याची मागणी पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
निवेदनाच्या सुरूवातीलाच सर्वप्रथम नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या आयुक्तपदी अभिजित बांगर यांची नियुक्ती झाल्याबद्दल व त्यांनी तात्काळ कार्यभार स्विकारल्याबद्दल पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी त्यांचे अभिनंदन व मनापासून स्वागत केले आहे.
नेरूळ नोडमधील महापालिका प्रभाग ८५ व ८६ मध्ये सारसोळे गाव, कुकशेत गाव आणि नेरूळ सेक्टर सहा परिसराचा समावेश होतो. प्रभाग ८६ मधील सारसोळे गावातील महापालिका शाळेत महापालिका प्रशासनाकडून काही दिवसापूर्वीच मास स्क्रिनिंग शिबिर आयोजित केले होते. पण त्यासाठी महापालिका आयुक्त, आरोग्य अधिकारी, अतिरिक्त आयुक्त, आरोग्य उपायुक्त तसेच मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री या सर्वाकडे गावातील युवा ग्रामस्थ व भाजपचा कार्यकर्ता मनोज यशवंत मेहेर मोठ्या संख्येने लेखी पत्रव्यवहार व पाठपुरावा करावा लागला होता. प्रभाग ८५ मध्ये मास स्क्रिनिंग शिबिर आयोजनाविषयी काही घटकांनी लेखी पाठपुरावा करूनही पालिका प्रशासनाकडून आजतागायत कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही, ही खेदाची बाब असल्याचे पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
प्रभाग ८६ व ८६ मध्ये कोरोना रूग्णांचा आकडा वाढतच आहे. काही कोरोनाग्रस्तांचे निधनही झाले आहे. त्यात एका पालिका सफाई कामगाराचाही समावेश आहे. सतत मिळणाऱ्या कोरोना रूग्णांमुळे दोन्ही प्रभागातील रहीवाशांमध्ये, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मास स्क्रिनिंग कॅम्पला अत्यल्पही प्रतिसाद मिळत नसल्याने या योजनेच्या यशाला मर्यादा पडल्या आहेत. १५ हजाराच्या आसपास अथवा त्याहून अधिक असणाऱ्या प्रभागात जेमतेम १०० ते १५० लोकच येत असल्याने या योजनेचा अपयशाची झालर लागून कोरोना वाढीला अडथळा आणणे शक्य झाले नाही. या दोन्ही प्रभागांची मिळून लोकसंख्या अंदाजे २५ हजाराच्या आसपास असेल. महापालिका प्रशासनाने या दोन्ही प्रभागात घरटी जावून डोअर टू डोअर मोफत स्क्रिनिंग कॅम्प राबविल्यास अधिकाधिक लोकांना याचा लाभ घेता येईल आणि कोरोना रोगाचेही निदान होईल. सध्या ऐरोली विधानसभा मतदारसंघातील कोपरखैराणे नोडमध्ये असा कार्यक्रम सुरु आहे प्रभाग ८५/८६ या दोन्ही प्रभागामध्ये घरटी जावून डोअर टू डोअर मोफत स्क्रिनिंग कॅम्प राबविणे काळाची गरज आहे. प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीत तसेच शेजारच्या सोसायटीत कोरोना रूग्ण सापडणे ही नवी मुंबईसारख्या नियोजित व प्रगत शहराला भूषणावह बाब नाही. समस्येचे गांभीर्य व प्रभाग ८५/८६मध्ये कोरोना रोगाचा उद्रेक पाहता पालिका प्रशासनाने शक्य तितक्या लवकर या दोन्ही प्रभागामध्ये घरटी जावून डोअर टू डोअर मोफत स्क्रिनिंग कॅम्प आयोजित करण्याची मागणी पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.