भास्कर गायकवाड
नवी मुंबई : नवी मुंबईतील कोरोनाग्रस्त रूग्णांना उपचारासाठी आवश्यक असणारी अॅक्टेमरा आणि रेमेडेसिविर ही औषध मोफत उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेना नेरूळ पश्चिमचे विभागप्रमुख व माजी नगरसेवक रतन मांडवे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबईत कोरोना रूग्णांची आकडेवारी वाढत चालली आहे. दिघा ते बेलापूरदरम्यान विस्तारलेल्या नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात खासगी तसेच महापालिका रूग्णालये कोरोना रूग्णांनी तुडूंब भरलेली पहावयास मिळत आहेत. खासगी रूग्णालयात कोरोना रूग्णांना उपचार करताना औषध लागल्यास महापालिका रूग्णालयांकडून उपलब्ध होत नाही. त्यासाठी पालिका रूग्णालयातच उपचार घ्यावे लागतील असा धोरणात्मक निर्णय असल्याचे सांगण्यात येत आहे. पालिका रूग्णालयात जागा नसल्याने कोरोना रूग्ण खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे आपण पालिका प्रशासनाला सर्वप्रथम खासगी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोना रूग्णांना औषध उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्याची मागणी रतन मांडवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
कोरोना रोगातून सुटका करून घेण्यासाठी कोरोना रूग्णांना अॅक्टेमरा आणि रेमेडेसिविर ही औषधे घ्यावी लागतात. ही औषधे मिळविण्यासाठी खासगी रूग्णालयातील रूग्णांना तारेवरची कसरत करावी लागते. ही एकतर ही औषधे महागडी असतात. सध्या कोरोना काळात सर्वाचेच आर्थिक राहणीमान खालावलेले आहे. कामधंदा नसल्याने प्रत्येक जण जीवन जगण्यासाठी संघर्ष करत आहे. त्यातच कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे आज विभागाविभागात दिसणारे कोरोना रूग्ण येत्या काळात घरटीही दिसण्याची भीती व्यक्त केली आहे. ही महागडी औषधे विकत घेणे सध्या कोरोना रूग्णांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे ही औषधे कोरोना रूग्णांना मोफत उपलब्ध करून देण्याचे निर्देश आपण नवी मुंबई महापालिका प्रशासनाला द्यावेत. नवी मुंबई ही श्रीमंत महापालिका आहे. अडीच हजार कोटीच्या ठेवी या महापालिकेच्या आहेत. कोरोना रूग्णांना अॅक्टेमरा आणि रेमेडेसिविर ही औषधे नवी मुंबईकरांना महापालिका प्रशासनाने मोफत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. वाटल्यास राज्य सरकारने महापालिका प्रशासनाला काही निधी उपलब्ध करून द्यावा. आपण लवकरात लवकर नवी मुंबईतील कोरोना रूग्णांना अॅक्टेमरा आणि रेमेडेसिविर ही औषधे मोफत उपलब्ध करून देण्याचे आदेश नवी मुंबई महापालिका प्रशासनाला द्यावेत अशी मागणी शिवसेना विभागप्रमुख रतन मांडवे यांनी केली आहे.