सुवर्णा खांडगेपाटील
नवी मुंबई : नेरूळ नोडमधील प्रभाग ९६ मधील नागरी समस्या
सोडविण्यासाठी नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना जनसेवक गणेश भगत यांनी
लेखी निवेदनातून साकडे घालताना समस्यांचे गांभीर्य जाणून घेण्यासाठी प्रभागात पाहणी
अभियान राबिण्याचाही गणेश भगत यांनी आग्रह धरला आहे.
प्रभाग ९६, नेरूळ नोडमधील एक प्रभाग, येथील नागरी समस्या सोडविण्यासाठी
व नागरी सुविधा मिळविण्यासाठी आमच्या घरातील चारही सदस्य पालिका विभाग कार्यालय, पालिका
मुख्यालय या ठिकाणी आमच्या चपला व तुमचे उंबरे झिजविण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून
करत आहोत. दुर्देवाने आम्हाला पालिका प्रशासनाकडून पाहिजे तसे सहकार्य मिळत नसल्याची
खंत यानिमित्ताने व्यक्त करावीशी वाटते. नागरि समस्या सोडविण्यासाठी आम्हाला लेखी पाठपुरावा
मोठ्या प्रमाणावर करावा लागतो. संबंधितांच्या सतत भेटीगाठी घ्याव्या लागतात. एका लोकप्रतिनिधीला
व त्याच्या परिवाराला नागरी समस्या सोडविण्यासाठी इतका मनस्ताप पालिका प्रशासनामुळे
झेलावा लागत असेल तर सर्वसामान्य करदात्या नवी मुंबईकरांची काय परिस्थिती होत असेल
याचा आपण यातूनच बोध घ्यावा, असे गणेश भगत यांनी आयुक्त बांगर यांना दिलेल्या निवेदनात
म्हटले आहे.
आजही प्रभागात ठिकठिकाणी डेब्रिजचे ढिगारे असून यामुळे प्रभागाला
बकालपणा आला असून साथीच्या आजारांचा उद्रेक होण्याची भीती आहे. वारंवार सांगूनही डेब्रिज
हटविले जात नाही. पावसाळीपूर्व कामांतर्गत केली जाणारी गटारे सफाईची तळापासून कामेही
व्यवस्थित झाली नसून गटारामध्ये आजही कचरा दिसत आहे. डासांच्या उपद्रवामुळे नागरिकांना
मलेरिया, डेंग्यूची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाच्या सुरूवातीला तसेच
निसर्ग वादळातही प्रभागात मोठ्या प्रमाणावर वृक्षांची पडझड झाली, ठिसूळ फांद्या गाडीवर
पडल्या. आम्ही भावंडांनि व कार्यकर्त्यांनी त्या फाद्या उचलून रस्ता मोकळा केला. तुम्ही
स्वत: प्रभागात भेटीला आल्यावरच तुम्हाला समस्यांचे गांभीर्य व आमच्या म्हणण्यामागील
कळकळ दिसून येईल. समस्या अजून खूप आहेत. आपण लवकरात लवकर या ठिकाणी स्वत: येवून पाहणी
अभियान करा. आम्ही अधिक न बोललेले बरे. त्या अभियानात आपणासही सहभागी करून घेण्याची
मागणी गणेश भगत यांनी केली आहे.