सौ. सुवर्णा खांडगेपाटील
मुंबई : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केलेल्या आवाहनानंतर राज्यभरातील युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यासाठी तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन दिले.
दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण वाढत चालले आहेत. देशभरात १० लाखांपेक्षा जास्त रुग्ण सापडले असून एकट्या महाराष्ट्रातच यापैकी ३ लाखाचा आकडा पार झाला आहे. अंतिम वर्षांच्या परीक्षा घेतल्या तर एकूणच विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. समूह संक्रमणाचा धोका बघता अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द कराव्यात, विद्यार्थ्यांकडून परिक्षा शुल्क घेवू नये आणि मागील सत्राच्या मिळवलेल्या गुणांच्या आधारे गुण देऊन निकाल जाहीर करावा, या तीन मागण्या युवक काँग्रेसने निवेदनाद्वारे राष्ट्रपतींकडे केल्या आहेत.
भारतात करोना रुग्णांची संख्या वाढत असून या विषाणूचे समूह संक्रमण सुरू झाले आहे, असा दावा विविध वैद्यकीय तज्ज्ञांनी केला असतानाही परीक्षा घेण्याचे आदेश काढणे म्हणजे जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व कुटुंबीयांचे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे, असे यावेळी तांबे यांनी सांगितले