शिवसेनेच्या रतन मांडवेंचे सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
नवी मुंबई : गणेशोत्सवाकरिता शहरवासियांना गावी येण्यासाठी कोरोना पार्श्वभूमीवर ठराविक कालावधीकरिता नियमात शिथीलता आणण्याची मागणी शिवसेनेचे नेरूळचे विभागप्रमुख व माजी नगरसेवक रतन नामदेव मांडवे यांनी सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनातून केली आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यात कोरोनाची व्याप्ती वाढत चालली असून शहरी तसेच ग्रामीण भागातही कोरोनाग्रस्तांची आकडेवारी वाढत चालली आहे. आपला सातारा जिल्हा तसेच आमची नवी मुंबई आणि मुंबईतही कोरोना रूग्णांचा आलेख उंचावत चालला आहे. आपण सातारा जिल्ह्यातील लोकांच्या जिवित रक्षणासाठी करत असलेल्या उपाययोजना प्रशंसनीय आहे. तथापि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातही नियम शिथील करण्यात आले आहेत. आपल्या जिल्ह्यातील रहीवाशी मोठ्या संख्येने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उरण-पनवेल, मुंबई उपनगरे, भाईदर आदी ठिकाणी वास्तव्य करत आहेत. गणेशोत्सवात गावातील घरच्या गणपतीच्या दर्शनासाठी शहरवासी एक-दोन गावी येतातच. कोरोनाचे गांभीर्य आम्हीही जाणून आहोत. अनुभवतही असल्याचे रतन मांडवे यांनी निवेदनात म्हटले आहे.
कोकणवासियांनी सरकारने गणेशोत्सवाकरीता नियम शिथील केले असल्याने कोकणवासिय आता गणेशोत्सवासाठी घरच्या गणपतीच्या दर्शनासाठी गावी येवू शकतील. तोच निकष सातारावासियांसाठी आपण लागू करावा. कोविड प्रतिबंधात्मकतेसाठी आपण नियमावली जरूर आखावी, कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी त्याचे पालन करणे आवश्यक आहे. आपणही कोकणच्या पार्श्वभूमीवर शहरवासियांकरीता गणेशोत्सव कालावधीत नियम शिथील करून शहरवासियांना गावच्या गणपती दर्शनासाठी येण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी नेरूळचे विभागप्रमुख व माजी नगरसेवक रतन नामदेव मांडवे यांनी सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.