सुवर्णा खांडगेपाटील
शिवसेना विभागप्रमुख रतन मांडवे यांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंकडे मागणी
नवी मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एसटी बसेसची सुविधा सुरू करण्याची मागणी नेरूळमधील शिवसेना विभागप्रमुख व माजी नगरसेवक रतन मांडवे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
गणेशोत्सव ऑगस्ट महिन्यात येत आहे. शहरातील रहीवाशी ग्रामीण भागात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने जात असतात. गणेशोत्सवासाठी कोकणवासियांना सरकार एसटीची सुविधा उपलब्ध करून देत आहे. ही खरोखरीच चांगली बाब आहे. तथापि कोकणच्याच धर्तीवर उर्वरित महाराष्ट्रातही गणेशोत्सवाकरिता गावी जाण्याकरिता एसटी बसेसची सुविधा किमान ऑगस्ट महिन्यात उपलब्ध करून द्यावी. खासगी वाहनांचे भाडे आता सर्वसामान्यांना परवडणारे नाही. त्यामुळे आपण महाराष्ट्रात गणेशोत्सवाकरिता जाण्याकरिता अन्य भागातही लवकरात लवकर एसटी बसची सुविधा देण्यासाठी संबंधितांना निर्देश द्यावेत, यातून ग्रामीण भागात गणेशोत्सव साजरा करण्याकरिता शहरवासियांना जाणे शक्य होईल आणि दुसरे म्हणजे एसटी उपक्रमाला निधीही प्राप्त होईल. आपण लवकरात लवकर याबाबत संबंधितांना निर्देश देवून महाराष्ट्रातील जनतेला दिलासा द्यावा, असे रतन मांडवे यांनी निवेदनात म्हटले आहे.