नवी मुंबई : सारसोळे गावातील मच्छि मार्केटमध्ये सुविधांचा दुष्काळ असून समस्या खूप आहेत. मच्छि विक्रेत्यांना मार्केट सोडून बाहेर विक्रीसाठी बसावे लागत असल्याने सारसोळे गावातील मच्छि मार्केटची पाहणी करण्याकरिता पाहणी अभियान राबविण्याची मागणी सारसोळे गावातील ग्रामस्थ व प्रभाग ८६ मधील भाजपचे स्थानिक नेतृत्व मनोज मेहेर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
सारसोळे गावातील मच्छि मार्केटची समस्या गंभीर होत चालल्याने एक ग्रामस्थ म्हणून आपणास पाहणी अभियानासाठी निमंत्रित करत आहोत. मच्छिमार्केट आतमध्ये व मच्छि विक्रेते बाहेर रस्त्यावर असे येथील चित्र आहे. मार्केटमध्ये मच्छि विक्रीचे व्यवहार होत नसल्याने मार्केट केवळ नामधारी बनले आहे. कोणत्याही मासळीचा बाजार होत नाही. मार्केटची दुरावस्था झाली असून मार्केटमध्ये आता विक्रीसाठी कोणताही व्यवहार होत नाही. मागील पाच वर्षात मच्छि मार्केटच्या डागडूजीसाठी तसेच सुविधांसाठी पालिका प्रशासनाकडून ५ पैशाचाही निधी खर्च करण्यात आलेला नाही. मार्केटची पाहणी केल्यास मासळी विक्रीसाठी बसण्यास व मच्छि ठेवण्यासाठीही पुरेशी जागा नाही. आपण पाहणी अभियानासाठी सारसोळे गावच्या मच्छिमार्केटसाठी प्रशासनाने मागील ५ वर्षात किती निधी खर्च केला आहे, याचीही माहिती मागवून घ्यावी. कारण विकासकामाच्या फाईली बनतात, कामे होत नाही. केवळ विकासकामे कागदावरच बनतात आणि त्यांची बिलेही लगेच मंजूर होतात. सगळा सावळागोंधळ आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी पाहणी अभियानास येण्यापूर्वी कागदावर जर काही विकासकामे या मच्छि मार्केटची झालीच असतील तर त्याची माहिती आणावी आणि ग्रामस्थांकडून खातरजमा करावी, असे मनोज मेहेर यांनी निवेदनात म्हटले आहे.
मार्केटमध्ये सुविधांचा अभाव आहे आणि अन्य समस्याही आहे. मच्छि मार्केटची आपण स्वत: पाहणी केल्यास आपणास येथील समस्यांची तात्काळ जाणिव होईल. आपण लवकरात लवकर पाहणी अभियान आयोजित करून येथील समस्या दूर कराव्यात आणि ग्रामस्थांना सुविधा मिळवून देण्याची मागणी मनोज मेहेर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.