शिवसेना विभागप्रमुख रतन मांडवेंचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना साकडे
नवी मुंबई : कोरोनामुळे अनेक ठिकाणी कंपन्या, कारखाने बंद आहेत. रेल्वे बंद आहेत. दळणवळणाची साधने नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने जुन-जुलैप्रमाणेच आगामी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याकरिता रेशनकार्ड नसलेल्या परंतु आधार कार्ड असलेल्या मजुरांना व अन्य श्रमिक वर्गाला शिधा वाटप दुकानांवर मोफत धान्य उपलब्ध करून देण्याची मागणी नेरूळ पश्चिमचे विभागप्रमुख रतन मांडवे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर आपण कामानिमित्त आलेल्या, परंतु ज्यांच्याकडे आधारकार्ड आहे, परंतु स्थानिक भागातील रेशन कार्ड नाही अशा लोकांसाठी शिधावाटप दुकानांतून जुन व जुलै महिन्याकरिता धान्य उपलब्ध करून दिले आहे. मजुरांना व अन्य श्रमिक वर्गाला प्रती व्यक्ती दरमहा पाच किलो धान्य मोफत उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर आधार मिळाला होता. या लोककल्याणकारी निर्णयाबाबत आपले मानावे तितके आभार कमीच आहे. आता जुलै महिना संपत आला आहे. कोरोना ग्रामीण तसेच शहरी भागात अजूनही आटोक्यात आलेला नाही. उलट शहरी भागासह ग्रामीण भागातही लॉकडाऊन वाढवावा लागला आहे. अद्यापि रेल्वेही सुरु झालेल्या नाही. दळणवळणाची साधने ठप्प आहेत. कंपन्या-कारखाने मोठ्या संख्येने बंद असल्याने अनेकांचे अर्थकारणही मंदावलेले आहे.या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शिधापत्रिका नसलेल्या आधार कार्डधारकांना जुन जुलैप्रमाणेच ऑगस्ट, सप्टेंबर या आगामी दोन महिन्यातही शिधावाटप दुकानावर मोफत धान्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी रतन मांडवे यांनी केली आहे.