सुवर्णा खांडगेपाटील
नवी मुंबई : जुईनगर नोडमध्ये सेक्टर २३ मधील महापालिका जुईपाडा समाजमंदिर, विवाह हॉल या ठिकाणी अॅटीजेन टेस्ट युध्दपातळीवर सुरू करण्याची मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष व नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत आणि नवी मुंबई कॉंग्रेसच्या जिल्हा सचिव विद्या यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.
महानगरपालिकेच्या जुईनगर नोडमध्ये कोरोनाचा उद्रेक झालेला आहे. त्यामुळे रहीवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महापालिकेकडून प्रसिध्द होणाऱ्या कोरोना आकडेवारीवर नजर मारली असता, आपणास दररोज जुईनगर नोडमधील सेक्टर २३, २४, २५ मध्ये असलेल्या कोरोना रूग्णांची आकडेवारी पहावयास मिळेल. येथील रहिवाशांना कोरोना आजाराबाबत अॅटीजेन चाचणीकरिता नेरूळ रेल्वे स्टेशनजवळील महापालिकेच्या माता बाल रूग्णालयात जावे लागते. कोरोना काळात एकतर रहीवाशांना रिक्षा व अन्य वाहनेही उपलब्ध होत नसल्याने रहीवाशांना पायपीट करत जावे लागते. कोरोना रोगाचा वाढता प्रभाव व करावी लागणारी पायपीट पाहता महापालिका प्रशासनाने जुईनगर नोडमधील सेक्टर २३ येथील महापालिकेच्याच जुईपाडा समाजमंदिर, विवाह हॉल या ठिकाणी लवकरात लवकर जुईनगरवासियांकरिता अॅटीजेन टेस्ट युध्दपातळीवर सुरू करावी. समस्येचे गांभीर्य पाहता आपण शक्य तितक्या लवकर अथवा अवघ्या काही तासात सकारात्मक प्रतिसाद देताना सकारात्मक सहकार्य कराल अशी अपेक्षा रवींद्र सावंत यांनी व्यक्त केली आहे.