नवी मुंबई : कोरोना रूग्णांची वाढती मागणी पाहता प्रभाग ८७ मधील नेरूळ सेक्टर ८ व १० परिसरात घरोघरी जावून मास स्क्रिनिंग करण्याची मागणी शिवसेना विभागप्रमुख व माजी नगरसेवक रतन मांडवे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
नवी मुंबई शहरात कानकोपऱ्यात कोरोनाचे रूग्ण वाढू लागले आहेत. नवी मुंबईच्या शहरी व ग्रामीण भागातही कोरोना रूग्ण दररोज मोठ्या संख्येने आढळून येत आहे. महापालिका प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे, उपाययोजना केल्या जात आहे. ठिकठिकाणी अॅण्टीजेन चाचणीही सुरू केली आहे. नेरूळ सेक्टर ८ व १० परिसर हा पूर्णपणे सिडको गृहनिर्माण सोसायट्यांचा परिसर व एलआयजी वसाहतीचा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेरूळ सेक्टर १० परिसरात घरटी जावून महापालिका प्रशासनाकडून मास स्क्रिनिंग करण्यात येत आहे. नेरूळ सेक्टर ८ मधील सिडको सदनिकाधारकांत व एलआयजीमधील रहीवाशांमध्ये तसेच खासगी सोसायटीतील रहिवाशांत भीतीचे वातावरण आहे. अॅण्टीजेनसाठी गेल्यास आपण निरोगी असलो तरी तेथील कोरोना रूग्णामुळे आपणासही कोरोना होईल असा समज येथील रहीवाशांमध्ये असल्याचे रतन मांडवे यांनी निवेदनात म्हटले आहे.
नेरूळसेक्टर १० व ८ मध्ये पालिका प्रशासनाच्या वतीने घरोघरी मास स्क्रिनिंग केले जावे यासाठी आम्ही यापूर्वीही पालिका प्रशासनाकडे लेखी पाठपुरावा केलेला आहे. समस्या गंभीर आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण घालविण्यासाठी लवकरात लवकर पालिका प्रशासनाकडून सेक्टर ८ मध्ये घरोघरी मास स्क्रिनिंग करण्याचे अभियान सुरू करण्याची मागणी रतन मांडवे यांनी केली आहे.