गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या आयुक्त अभिजित बांगरांना सूचना
नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्रातील वाढत्या कोरोना संक्रमनात एपीएमसी मार्केट हॉट स्पॉट ठरत असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोनाच हॉटस्पॉट समजले जाणाऱ्या एपीएमसीकडे जास्त लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी मनपा आयुक्तांना दिल्या. नवी मुंबईतील कोरोनाचा आढावा घेत शहरात करण्यात येत असलेल्या उपाययोजनेसंदर्भात मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते.
नवी मुंबई शहरात कोरोनाचा संसर्ग मोठया प्रमानात होत असून १५ हजाराच्या घरात कोरोना रूग्ण झाले आहेत. कोरोनामुळे आतापर्यत चारशे हून अधिक जणांचे मृत्यू झाले आहेत. या वाढत्या कोरोना संक्रमनात एपीएमसी मार्केट कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहे. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये म्हणून एपीएमसी मार्केट सुरू ठेवण्यात येत आहे. मात्र बाजारातील वाढत्या गर्दीमुळे या ठिकाणी कोरोना संक्रमण वाढत आहे. त्यामुळे या ठिकाणी जास्त लक्ष्य केंद्रीत करुन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी विशेष प्रयत्न करावे, अशा सूचना सतेज पाटील यांनी केल्या.
तसेच कोरोनामुळे एपीएमसी व शहरातील होणारे मृत्युदर कमी करणे या दोन गोष्टींकडे जास्त लक्ष देण्याच्या सूचना गृहमंत्र्यांनी मनपा आयुक्तांना दिल्या. गृहमंत्री सतेज पाटील यांनी नवी मुंबईतील कोरोनाचा आढावा घेत शहरात करण्यात येत असलेल्या उपाययोजनेसंदर्भात मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्याशी चर्चा केली. यावेळी आयुक्तांनी एपीएमसीमध्ये अँटीजन टेस्ट सेंटर सुरू करण्यात आले असून रोज ५०० नागरिकांच्या टेस्ट करणार असल्याची माहिती गृहमंत्र्यांना दिली असल्याची माहिती नवी मुंबई कॉंग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी दिली.