
नवी मुंबई : नवी मुंबईतील कोरोना रुग्णांची प्रचंड वाढती संख्या पाहता कोरोना चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल जलद प्राप्त व्हावा, याकरिता नवी मुंबईमध्येच कोरोना टेस्टींग केंद्र आणि लॅब उभारण्याकरिता गेले चार महिने सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. लवकरच नवी मुंबईमध्ये कोरोना चाचणी केंद्र उभारले जाणार असून त्याचा नागरिकांना फायदा होऊन कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यास मदत होणार आहे, अशी माहिती ‘बेलापूर’च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी दिली.
आमदार सौ.मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबईत ‘कोव्हीड-१९’च्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे शहरातच स्वतंत्र कोरोना टेस्टींग सेंटर उभारण्यात यावे यासाठी मी ५ मे रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले होते. तसेच ‘ठाणे’चे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना यासंदर्भात आमदार निधीतून तरतूद करण्यासंबंधी पत्र दिले होते. तद्नंतर नवी मुंबईतील रुग्णांचा वाढता प्रभाव पाहता तसेच एपीएमसी बाजार आवार ‘कोरोना’चे केंद्रबिंदू ठरल्याने २१ मे रोजी एपीएमसी बाजार आवारात कोरोना चाचणी केंद्र उभारण्याची मागणी तत्कालीन महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ आणि ‘एपीएमसी’चे प्रशासक तथा अतिरिक्त आयुक्त सतीश सोनी यांजकडे केली होती. तसेच तत्कालीन आयुक्त मिसाळ यांना २८ मे रोजी पुन्हा स्मरणपत्र दिले होते, असे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
यानंतर १ जून रोजी बंद अवस्थेतील असलेले वाशी येथील जुने कामगार हॉस्पिटल येथे कोरोना टेस्टींग सेंटर आणि बाजुलाच असलेल्या कर्मचारी वसाहतमध्ये विलगीकरण केंद्र उभारण्याची सूचनाही केली होती. तसेच विद्यमान महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची शिष्टमंडळासह प्रत्यक्ष भेट घेवून कोरोना त्यांच्याकडेही टेस्टींग केंद्र लवकरात लवकर उभारणीकरिता पाठपुरावा केला होता. एकंदरीतच कोरोना टेस्टींग केंद्रासाठी केलेले प्रयत्न आणि शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून लवकरच नवी मुंबईत स्वतंत्र कोरोना चाचणी केंद्र उपलब्ध होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केल्याचे आ. सौ. मंदाताई म्हात्रे म्हणाल्या.
कोरोना महामारीने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असताना नवी मुंबईतील रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस सुमारे ३०० ते ४०० ने वाढत आहे. नवी मुंबई महापालिका श्रीमंत महापालिका म्हणून गणली जात असताना या महापालिकेकडे स्वतचे कोरोना चाचणी केंद्र नसणे, ही खेदाची बाब आहे. नवी मुंबईतील कोरोना रुग्णांचा अहवाल मुंबईतील हॉस्पिटलमध्ये चाचणी करिता पाठवावा लागत असल्याने अहवाल येण्यास उशीर होत होता. त्यामुळे कोरोना रुग्ण इतरांच्या संपर्कात आल्याने संसर्ग रुग्णांची संख्या वाढत होती. त्यामुळे नवी मुंबईत स्वतंत्र कोरोना टेस्टींग केंद्र आणि लॅब उभारण्याची मागणी करुन त्याकरिता माझा आमदार निधीही दिला आहे. आता नवी मुंबईत लवकरच स्वतंत्र कोरोना चाचणी केंद्र उपलब्ध होणार असल्याने नवी मुंबईकरांसह मी देखील आशावादी असल्याचे बेलापुरच्या भाजप आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.