
सुवर्णा खांडगेपाटील
नवी मुंबई : कोरोनाचे सावट असल्यामुळे यंदा सारसोळेचा नारळीपौर्णिमा उत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. पालखीसोहळा शांततेत पार पडला असला तरी सारसोळेच्या ग्रामस्थांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नव्हता. सारसोळेच्या खाडीमध्ये नारळ खाडीला अर्पण करावयास गेलेल्या सारसोळेच्या ग्रामस्थांचा उत्साह खाडीतील लाटांनाही माघार घ्यायला लावत होता.
नारळीपौर्णिमा हा खाडीमध्ये मासेमारी करणाऱ्या नवी मुंबईतील आगरी-कोळी समाजाचा पारंपारिक उत्सव. त्यामध्ये गेल्या काही वर्षापासून नवी मुंबईत सारसोळेची नारळी पौर्णिमा हा उत्सव बहूचर्चित झालेला आहे. सारसोळे ग्रामस्थांची या उत्सवात मोठ्या प्रमाणावर उपस्थिती, महिलांचा लक्षणीय सहभाग, पारंपारिक नृत्य, पालखी सोहळ्यात सर्वपक्षीय राजकारण्यांचा उत्साही सहभाग, पत्रकार, छायाचित्रकार, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी या दृश्यामुळे सारसोळेची नारळीपौर्णिमा गेल्या काही वर्षात नवी मुंबईत मानाची व प्रतिष्ठेची बनलेली आहे. गावातील होळी मैदानापासून ते सारसोळे जेटीपर्यत काढण्यात येणाऱ्या पालखी सोहळ्याला तीन ते साडेतीन तास लागायचे. यंदा मात्र हा पालखी सोहळा अवघ्या काही मिनिटाचा ठरला. जेटीवर मात्र गर्दी मोठ्या प्रमाणावर होती. नारळीपौर्णिमा पूर्णपणे पारंपारिक पध्दतीनेच साजरी कऱण्यात आली.
कोरोनामुळे नारळीपौर्णिमा साधेपणाने झाली असली तरी सारसोळे ग्रामस्थांचा उत्साह कायम होता. कोलवाणी माता मित्र मंडळ, सारसोळे ग्रामस्थांनी कोळीवाडा ते सारसोळे जेटीदरम्यान पालखी काढली. यावेळी दरवर्षीप्रमाणेच सारसोळे जेटीवर प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींची झुंबड उडाली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच राजकारणीविरहीत नारळी पौर्णिमा साजरी झाली. खाडीमध्ये सारसोळेच्या ग्रामस्थांचा बोटीमधील उत्साह, पारंपारिक गाणी आणि वरून होणारी वरूणराजाची पर्जन्यवृष्टी हा सर्वच प्रकार विलोभनीय होता. मित मनोज मेहेर या ४ वर्षाच्या कोळीबालकाचे खाडीतील पाण्यात नारळ विसर्जन हाही या उत्सवातील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. कोरोना, सोशल डिस्टन्स सर्वच पालन करत निघालेला पालखी सोहळा साधेपणाने असला तरी पुढच्या वर्षी यंदा कसर भरून काढण्याचा संकल्प सारसोळेच्या युवा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आला. नवी मुंबईचे विकासपर्व माजी आमदार संदीप नाईक, सुरज पाटील यांना थेट खाडीतून सारसोळेच्या नारळी पौर्णिमेचे लाईव्ह दर्शन घडविण्यात आले. भाजपच्या स्थानिक नगरसेविका सुजाताताई पाटील यांनाही कोलवाणी माता मंदिर,पालखी सोहळा, जेटीवरील आरती व नारळ विसर्जनाचे लाईव्ह दर्शन करविण्यात आले. वंचित बहूजन आघाडीचे विरेंद्र लगाडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महादेव पवार, हाडवळे, भाजपचे रवींद्र भगत सहभागी झाले होते. सागराच्या उसळत्या लाटेत कोरोनाचे विसर्जन करण्याची प्रार्थना खाडीकडे कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज मेहेर यांनी प्रार्थना केली. सारसोळेच्या पालखी सोहळ्याला वरूण राजांनी आपल्या धारांमधून थेट पावसाचा अभिषेक केला. अंत्यत शिस्तबध्द वातावरणात कोणत्याही गालबोटाविना सारसोळे ग्रामस्थांची नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी झाली.