
वाहता धबधबा , खळखळणारे पाणी , उडणारे फुलपाखरू पाहण्यासाठी पर्यटकांची रेलचेल
निलेश मोरे
मुंबई : पावसाळ्यात निसर्गाचे बदलणारे रूप, डोंगर दऱ्यावरून वाहणारे झरे, धबधबे, उंच डोंगरावर पसरलेली हिरवळ पर्यटकांना मोहित करत असते. महाराष्ट्रात असे अनेक पर्यटन स्थळे प्रसिद्ध आहेत, जिथे पर्यटक पावसात मित्र परिवार , कुटुंबासहित पर्यटनाचा आनंद लुटतात. यंदा कोरोना विषाणूच्या महामारीमुळे महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांवरही मोठा परिणाम झालेला आहे. मात्र राज्याच्या अनेक कानाकोपऱ्यात असेही निसर्ग सौंदर्य आहे, जे पर्यटकांना मोहित करत आहे. घाटकोपर पश्चिम येथील खंडोबा टेकडीवर निसर्गाचा रानमळा फुलत आहे. खंडोबा टेकडीचा बहुतांश डोंगरभाग हिरवाईने नटला असून विविध झाडे , रंगीबिरंगी फुलपाखरू , डोंगरावरून वाहणारा झरा धबधब्याच स्वरूप घेत असल्याने येथील युवावर्ग , लहानमुलांसह पालक ही या स्थळाला भेट देत निसर्गाचा मनमुराद आंनद लुटताना दिसत आहेत. खंडोबा टेकडीच्या या निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानंतर येणारा मातीचा सुगंध, डोळ्यांना दिपणारे फुलपाखरू , कानावरती खळखळणारा धबधब्याचा आवाज, पक्षाचा स्वरानंद, विविध प्रकारची झाडे झुडपे, मनाला वेगळाच आनंद देतात. निसर्गाचे हे सौंदर्य टिकवण्यासाठी येथील पर्यटन प्रेमीनी डोंगर ग्रुप व घाटकोपर प्रगती मंच ग्रुप स्थापन केले असून युवक वृक्षरोपण व त्याच संवर्धन करण्यासाठी आठवड्यातून फेरफटका मारण्यासाठी येतात. घाटकोपरमध्ये नव्याने निर्माण होत असलेल्या निसर्ग पर्यटन स्थळाकडे शासनाने लक्ष देऊन याचा विकास करण्याची आवश्यकता आहे. येथील विकास झाल्यास शासनाच्या महसुलातही भर पडेल आणि मुंबईकरांना एक चांगले पर्यटन स्थळ उपलब्ध होईल.
- हे पर्यटन स्थळ निर्माण होत असताना सुरक्षेच्या दृष्टीने याकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष असले पाहिजे. याच्या पुढील विकासासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी प्रयत्न केले पाहिजे. :- विनोद जाधव ( पर्यटक )