
मुंबई : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनाने राजकारणातील सज्जन माणूस हरपला असून आपण एक चांगले मित्र गमावले आहेत. अशा शब्दांत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी खा. मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.
डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करताना खर्गे म्हणाले की, डॉ. निलंगेकर हे माझ्या राजकीय कार्यक्षेत्राला लागून असलेल्या जिल्ह्यातील असल्याने त्यांचा माझा गेले पन्नास वर्षे परिचय तर होताच पण मैत्रीही होती. त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हैद्राबाद मुक्ती संग्राम चळवळीत सक्रीय सहभाग घेतला होता. महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांनी प्रभावित होऊन ते काँग्रेस पक्षात सक्रिय झाले. ते आयुष्यभर काँग्रेस विचारांशी एकनिष्ठ राहिले. राज्य मंत्रीमंडळात विविध खात्याचे मंत्री, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदाची जबाबदारीही यशस्वीरित्या सांभाळून पक्ष संघटना मजबूत केली. सर्वांना सोबत घेऊन कामं करण्याचा त्यांचा स्वभाव होता.
डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाची व वैयक्तीक माझी कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून अखिल भारतीय काँग्रेस कमिटी निलंगेकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे असे खर्गे म्हणाले.