
रहीवाशांच्या वीज समस्यांचे निवारण करण्यासाठी कॉंग्रेसचा अभिनव उपक्रम
नवी मुंबई : वीज देयक यंदा अव्वाच्या सव्वा आल्याने रहीवाशी त्रस्त झाले आहेत.नेरूळ पूर्वेला एमएसईडीसीच्या कार्यालयात चकरा मारूनही रहीवाशांचे समाधान होत नाही, उलट नाहक हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे रहीवाश व एमएसईडीसी यांच्यात थेट सुसंवाद असावा आणि वीजदेयकाबाबतच्या समज-गैरसमजाचे निवारण व्हावे यासाठी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हा प्रवक्ते व कॉंग्रेसचे नेरूळ तालुकाध्यक्ष रवींद्र सावंत यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता गायकवाड यांना भेटून रहीवाशांच्या दारी येवून समस्या ऐकून घेण्याचे साकडे घातले. सावंत यांच्या मागणीला न्याय देताना वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नेरूळ सेक्टर दोन येथील आदर्श सोसायटीत येवून रहीवाशांशी सुसंवाद साधला.
कार्यकारी अभियंता गायकवाड यांनी तात्काळ संबंधित अधिकारी धोंगडे यांना निर्देश देवून नेरूळ सेक्टर दोनमधील रहीवाशांच्या घरी जावून वीजदेयकांबाबत सुसंवाद साधण्यास सांगितले. त्यानुसार बुधवारी दुपारी नेरूळ सेक्टर दोनमधील आदर्श सोसायटीमध्ये येवून वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी रहीवाशांशी सुसंवाद साधला. सुरूवातीला भारत सोसायटीतील रहीवाशांशी सुसंवाद साधत अधिकाऱ्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेत वीजेबाबतची वस्तूस्थिती मांडली. वीजदेयक कशा प्रकारे काढण्यात आले, हेही समजावून सांगण्यात आले. सोसायटीतील रहीवाशांनी कोरोना पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स ठेवत आपल्या तक्रारी सादर केल्या. वीजदेयक दोन टप्प्यात भरा, असे वीज अधिकाऱ्यांनी यावेळी रहीवाशांना लिहूनही दिले.
त्यानंतर वीज वितरण अधिकाऱ्यांनी सेक्टर दोनमधील आदर्श सोसायटीतील रहीवाशांशी सुसंवाद साधला. या सोसायटीत २०० सदनिका आहेत. सोसायटीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांनी रहीवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. एमएसईडीसीचे अधिकारीच थेट सोसायटीत आल्याने रहीवाशांचा वीज कार्यालयात जाण्याचा हेलपाटा वाचला. रहीवाशांच्या समस्यांचेही निवारण झाले.
यावेळी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हा प्रवक्ते व कॉंग्रेसचे नेरूळ तालुकाध्यक्ष रवींद्र सावंत, नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर, राहूल कापडणे, आदर्श सोसायटीचे अध्यक्ष निवृत्ती कापडणे, सचिव दिपक आंबेकर, महेश भोईटे, शिरगावकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.