
सुवर्णा खांडगेपाटील
नवी मुंबई : बुधवार, दि. ५ ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार वादळी पावसाने नवी मुंबईला तडाखा दिला. या पावसात नेरूळ प्रभाग ९६ मधील सेक्टर १६,१८ मध्ये वृक्षांची व ठिसूळ फांद्यांची पडझड झाली. पालिकेच्या उद्यानाचीही हानी झाली. हे सर्व पाहणी करण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी पाहणी अभियान तात्काळ राबविण्याची मागणी भाजपच्या गणेश भगत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
या पावसात प्रभाग ९६ मध्ये सेक्टर १८ परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष व ठिसूळ फांद्या रस्त्यावर पडल्या. यामुळे वाहतुक कोंडी होण्याची भीती लक्षात घेवून भाजपच्या गणेश भगत, रवींद्र भगत व अन्य सहकाऱ्यांनी तात्काळ ही झाडे व फांद्या एका कोपऱ्यात नेवून रस्ता वाहतुकीस मोकळा केला. नेरूळ सेक्टर १६ परिसरातील महापालिकेच्या छत्रपती संभाजी राजे उद्यानातही झाडे पडून संरक्षक भिंतीच्या ग्रीलचेही नुकसान झाले. तसेच उद्यानातील खेळण्यांचीही मोडतोड झाली. आयुक्तांनी स्वत: पाहणी केल्यास आपणास समस्येचे गांभीर्य निदर्शनास येईल, असे गणेश भगत यांनी निवेदनात म्हटले आहे. या संरक्षक भिंतीच्या ग्रीलची व उद्यानातील खेळण्याची लवकरात लवकर डागडूजी करण्याचीही मागणीही गणेश भगत यांनी केली आहे.
प्रभागातील रस्त्याच्या कोपऱ्यावर पडलेली झाडे व गोळा करून ठेवलेल्या फांद्या तात्काळ उचलण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणीही गणेश भगत यांनी निवेदनातून केली आहे. याच समस्येबाबत झाडे व फांद्या लवकर उचलण्यासाठी गणेश भगत यांनी नेरूळच्या विभाग अधिकाऱ्यांनाही स्वतंत्र निवेदन सादर केले आहे.