नवी मुंबई : चष्मा हा सुद्धा एक अत्यावश्यक सेवेतील भाग आहे. साधारणतः कोरोनाचा फैलाव सुरू झाल्यापासून आजतागायत चष्म्याची दुकाने सुरू करण्यास नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अजूनही परवानगी दिली नाही.त्यामुळे लहान मुलापासून ते वयोवृध्द नागरिकांना याचा त्रास होत आहे. त्यामुळे दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच दरम्यान चष्म्याची दुकाने काही अटीवर सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे बेलापूर विधासभा अध्यक्ष दिनेश ठाकूर यांनी मनपा आयुक्त अभिजित बांगर याना भेटून व लेखी निवेदन देऊन केली आहे.
मार्च महिन्यापासून कोरोनाचा फैलाव सुरू झाल्यानंतर मनपा क्षेत्रांतील चष्म्याची दुकाने बंद आहेत. आजच्या घडीला अनलॉक सुरू झाला असताना सुद्धा चष्म्याची दुकाने बंद आहेत. ज्या वृद्ध, तरुण नागरिकांच्या डोळ्यांना त्रास आहे, अशा नागरिकांना चष्मा हा अत्यावश्यक झाला आहे. तसेच ऑन लाईन शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनाही चष्मा लागत आहे.त्याचबरोबर लाखो नागरिक ऑन लाईन काम करत आहेत.त्यामुळे त्यांच्या डोळ्यांना त्रास होत आहे.अशा परिस्थितीत चष्म्याची दुकाने बंद असल्याने विद्यार्थी, तरुण, वृद्ध नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे असेही आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
शेजारी असणाऱ्या पनवेल व ठाणे मनपा हद्दीत चष्म्याच्या दुकानांना सुरू करण्यास परवानगी दिली आहे.तसेच नवी मुंबई मध्ये सुद्धा p1 व p2 नुसार इतर दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. परंतु चष्म्याची दुकाने अजूनही आपण सुरू करण्यास परवानगी दिली नाही.तरी आठवड्यातील सात ही दिवस शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार चष्म्याची दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी शेवटी आयुक्तांना निवेदनात विनंतीही केली आहे.
शासनाच्या आदेशानुसार चष्म्याच्या दुकानाना परवानगी देण्यात येईल असे यावेळी नवी मुंबई महापालिका आयु्क्त अभिजित बांगर यांनी सांगितले.