नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंतांची पालिका आयुक्तांकडे मागणी
सुवर्णा खांडगेपाटील
नवी मुंबई : महापालिका प्रशासनाकडून बहूउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांवर वेतन तफावतीमध्ये अन्याय होत असून या अन्याय तातडीने दूर करून त्यांची सेवा प्रशासनात कायम करण्याची लेखी मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
सध्या सर्वत्र कोरोनाचा उद्रेक झाला असून नवी मुंबईच्या कानाकोपऱ्यातही कोरोना रूग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. कोव्हिड १९ या काळात गेल्या ४ महिन्यापासून प्रशासनामध्ये कार्यरत असणारे बहूउद्देशीय आरोग्य कर्मचारी कोव्हिड योध्दा म्हणून कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झालेली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने दि. १६ जुलै २०२० रोजी प्रसिध्द केलेली करार पध्दतीवर नियुक्त करण्यासाठी जाहिरातीमध्ये अॅक्झिलर नर्स मिडवाईफ (एएनएम) या पदास ३५ हजार मासिक वेतन प्रसिध्द करण्यात आले आहे. अॅक्झिलरी नर्स मिडवाईफ व बहूउद्देशीय आरोग्य कर्मचारी ही दोन्ही पदे शासकीय नियमानुसार समान असून त्यांचे कर्तव्य व जबाबदाऱ्यादेखील समान आहेत. गेल्या १० ते १२ वर्षापासून हे बहूउद्देशीय कामगार करार तत्वावर कार्यरत कोव्हिड १९ या काळात राष्ट्रीय किटकजन्य रोग नियत्रंण अंर्तगत जबाबदाऱ्या सांभाळून कोव्हिड १९ पॉझिटिव्ह रूग्णांच्या कार्यक्षेत्रात सर्व्हे करणे, कार्यक्षेत्रात जावून कोव्हिड १९ रूग्णास मेडिसीन देणे, रूग्णांना रूग्णवाहिका उपलब्ध करून देणे, रिपोर्टिंग करणे आदी जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. इतकी कामे करूनही या बहूउद्देशीय कामगारांना अवघ्या २० हजार मासिक वेतनावर काम करावे लागत आहे. या तुटपुंज्या वेतनात हे कामगार कोव्हिड १९मध्ये वरिष्ठांनी दिलेली इतर कामेही पार पाडत आहेत. समान कामाला समान न्याय मिळणे आवश्यक आहे. पालिका प्रशासनाने १६ जुलै २०२० रोजी अॅक्झिलरी नर्स मिडवाईफ या पदास दिलेल्या जाहिरातीनुसार या बहूउद्देशीय कामगारांनाही मासिक वेतन देण्यात यावे व या कामगारांची सेवा पालिका प्रशासनाने कायम करण्याची मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
अन्य एका निवेदनात पालिका प्रशासनात कार्यरत असलेल्या कुशल कामगारांना पूर्वलक्षी प्रभावाने फरकासह वेतन देण्याची व या कुशल कामगारांचीही सेवा पालिका प्रशासनाने कायम करण्याची मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.