राजेंद्र पाटील : ९९६७२८५६१८
पनवेल : कोरोना महामारीच्या काळात सर्व स्तरातील नागरिक प्रचंड मानसिक तणावाखाली वावरत आहेत. त्यामुळे आसपास घडणाऱ्या अकल्पनीय घडामोडींमुळे मनात भीतीचे सावट निर्माण झाले आहे. अशातच अचानक येणारा रुग्णवाहिकेच्या सायरनचा आवाज हा अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवत असून नागरिकांच्या मानसिक संतुलनासाठी ते घातक ठरत आहे. रुग्णवाहिका चालक विनाकारण सायरन चालू ठेवत असल्याचे आढळून येत असल्याने या प्रकाराला आळा घालण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ब चे सभापती नगरसेवक संजय भोपी यांनी आयुक्तांना ई-मेल द्वारे निवेदन दिले आहे.
जागतिक महामारीच्या आव्हानात्मक काळात नागरीक कोरोना या रोगाचा निकराने सामना करत आहेत या परिस्थितीत प्रशासन आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी म्हणून नागरिकांच्या रक्षणार्थ कोरोनाविरोधात लढा देत आहेत. नागरिकांच्या आरोग्य सोबतच मानसिक आरोग्याची देखील काळजी घेणे सद्यस्थितीत गरजेचे झाले आहे. सध्याच्या लॉकडाऊन मुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ असताना देखील रुग्णवाहिका चालक विनाकारण सायरन चालूच ठेवत असल्याचे समोर आले आहे. वास्तविक पाहता रुग्णवाहिकेच्या मार्गात अडथळा निर्माण होत असल्यास सायरन वाजवणे अभिप्रेत आहे. मात्र परिसरात तसे होताना दिसून येत नाही. या आवाजामुळे नागरिकांच्या मनातील भीती अधिकच वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विनाकारण सायरन वाजवण्यास मनाई करण्याची मागणी संजय भोपी यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.